अनिल ठाणेकर
ठाणे : एप्रिल २०२४ मध्ये व्यावसायिक पूर्व परिक्षेकरिता सुपरवायझर राहिलेल्या शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
एप्रिल २०२४ महिन्यात शासनाने व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या पूर्व परीक्षा आयोजित केलेल्या होत्या, त्या पूर्व परीक्षांना काही शिक्षक, शासकीय कर्मचारीवर्ग सुपरवायझर म्हणून त्यांचे कर्तव्य बजावत होते. परिणामी त्यांना एप्रिल २०२४ मध्ये पोस्टल बॅलेट करिता फॉर्म भरून देता आले नाहीत. त्या दिवशीचे निवडणूक प्रक्रियेचे ट्रेनिंगही त्यांना घेता आले नाही. म्हणून अशा शिक्षकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आपण नोटिसा, मेमो बजावले होते. त्यांनी या नोटिस व मेमों यांना लेखी उत्तर दिल्यानंतर आपणास वस्तुस्थिती अवगत झालेली असतानाही असे शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांना पोस्टल वोटिंग पासून आपण वंचित ठेवत आहात ही बाब अयोग्य आहे सदरची बाब ही अतिगंभीर असून कोणत्याही व्यक्तीला त्याचे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यापासून वंचित ठेवणे हे नक्कीच लोकशाहीला धोकादायक आहे. लोकशाहीच्या या उत्सवात निवडणूक आयोगाकडून याप्रकारे कृत्य घडणे ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि मारक आहे. ज्या शासकीय कर्मचारी तथा शिक्षकांना पोस्टल वोटिंग साठी वंचित राहावं लागलेले आहे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत तातडीने संपर्क साधून पोस्टल मतदान करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
