विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (ता. १४) वसईत येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारानिमित्त वसई-माणिकपूर येथील वायएमसीए मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ते प्रमुख म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
वसई सनसिटी येथील मैदानावर सायंकाळी साडेचार वाजता हेलिकॉप्टरमधून त्यांचे आगमन होईल. त्यानंतर येथून जवळच असलेल्या बिशप हाऊसला ते भेट देतील. त्या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि धर्मगुरूंसोबत संवाद साधतील. त्यानंतर नियोजित वेळेत सभास्थळी पोहोचून सभेला मार्गदर्शन करतील. उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीने भारती कामडी यांच्या रूपाने महिला उमेदवार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी ६ एप्रिल आणि उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी अनुक्रमे वसई व बोईसर येथे सभा घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनीही ८ मे रोजीच्या ‘बाईक रॅली`तून विरार-नालासोपारा भागातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे.
विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवार, ११ मे रोजी पालघरमध्ये पुन्हा भेट दिली होती. या भेटीत त्यांनी येथील विविध क्षेत्रांतील संघटनांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा वसईत जाहीर सभा घेत आहेत. पर्यावरण हानी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, औद्योगिकीकरण, वाहतूक व्यवस्था, अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत व पाणी योजना आदी विषयांवर या सभेतून ते जनतेशी संवाद साधतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
