कासा : डहाणू तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी भातपिके, गवत व्यापारी, वीट भट्टीचालकांचे चांगलेच नुकसान झाले. मात्र, पावसाच्या माऱ्यामुळे परिसरात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने अंगाची काहिली झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला.
हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण पावसाचे वातावरण नव्हते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा, धुळीचे लोट वाहत ढगाळ वातावरण तयार झाले. विजेचा कडकडाट होत पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी तासभर पाऊस झाला. डहाणू तालुक्यात गंजाड, कासा, धानिवरी या भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचे प्रमाण जास्त होते.
सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांवर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयार झालेले पीक कापण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी पिके शेतात सुकत टाकली होती. अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली, तर अनेक वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाले. तयार वीटभट्ट्यांवर सतरंज्या, ताडपत्री टाकण्यासाठी काही काळ मोठी धावपळ उडाली, तर गवत वखारीवाल्यांवरदेखील गवत भिजू नये, म्हणून ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली.
उन्हाळी भातकापणी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिके कापून शेतात सुकण्यासाठी ठेवली होती; पण अचानक आलेल्या या पावसाने शेतात पाणी साचून भातपिके भिजून गेली. त्याचप्रमाणे वीटभट्टीचालकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऐन हंगामात कच्च्या विटा भिजल्या असून तयार वीटभट्ट्यांचे नुकसान झाले.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका दरवेळी वीटभट्टीचालक, तसेच गवत पावली व्यावसायिकांना बसतो. यामुळे हा व्यवसाय पूर्वी पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत होता; पण आता नुकसानीच्या भीतीने या धंद्यात उतरण्यास कोणी तयार होत नाही.
तलासरीमध्ये गारांचा पाऊस
तलासरीतील कोचाई गावात वादळी वारा, गारांचा पाऊस पडला. यामुळे अजय छोटू हाडल यांच्या घराचे छप्पर उडाले. पावसाळ्यापूर्वी घराचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे. तसेच धानिवरी येथे एका घरावर झाड पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत.
