पालघर : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्ही मिळवणारच असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला. पालघर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेस, इंडी आघाडी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा प्रणीत एनडीए आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असून इंडी आघाडीची सर्कस मोदींचा मुकाबला करू शकणार नाही, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ.राजेंद्र गावीत, महेंद्र पाटील, मनोज पाटील, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आराखडा असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जनतेला संभ्रमित करणारी वक्तव्ये करत असले, तरी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून देशाला समृद्धी मिळवून देणारी निवडणूक आहे हे लक्षात ठेवा असे आवाहन त्यांनी पालघरवासीयांशी संवाद साधताना केले.

या सभेत बोलताना शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा संपूर्ण आलेखच जनतेसमोर मांडला. इंडी आघाडीकडे नेता नाही, सत्ता मिळाल्यास पंतप्रधान कोण होणार हे त्यांनाच माहीत नाही. त्यामुळे आळीपाळीने पंतप्रधानपदावर बसण्याचा त्यांचा इरादा आहे. आळीपाळीने देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती देशाचे नेतृत्व कसे करणार, कोणत्याही संकटातून देशाला कसे वाचविणार, देशाचा विकास कसा करणार, असा सवाल करून  शाह म्हणाले, विकास आणि जनतेची सुरक्षा यांची हमी केवळ मोदी हेच देऊ शकतात. ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. देश कोणाच्या हाती सुरक्षित, समृद्ध राहणार याचा निर्णय जनतेला करावयाचा आहे. एका बाजूला 12 लाख कोटींचे घोटाळे करणारे काँग्रेस व इंडी आघाडी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उभ्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले नरेंद्र मोदी यांच्यातील ही लढाई आहे, असे शाह म्हणाले.

हेमंत सावरा यांना दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. मोदींनी देशाला सुरक्षित बनविले, समृद्ध बनविले, देशाची प्रतिष्ठा जगात उंचावली आहे. काँग्रेस, शरद पवार आणि इंडी आघाडीतील अनेक घटक पक्षांनी  70 वर्षे अयोध्येतील राम मंदिरात अडथळेच आणले. मोदींनी पाच वर्षांतच राम मंदिराची न्यायालयीन लढाई जिंकली, मंदिर बांधले, आणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या समारंभाचे निमंत्रणही या आघाडीच्या नेत्यांनी झिडकारले, आणि बहिष्कार घातला. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले, कारण या सोहळ्यास हजेरी लावली तर व्होट बँक नाराज होईल, याची त्यांना भीती होती. मोदी यांनी 370 कलम रद्द करून काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. मोदी सरकारने नक्षलवाद, दहशतवाद नष्ट करून देशाला सुरक्षित बनविले. 80 कोटी गरीबांना मोफत धान्य देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणून त्यांची जीवनशैली उंचावण्याचे काम केले. घराघरांत गॅस दिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले, कोविडकाळात लस निर्माण करून मोदींनी 130 कोटी लोकसंख्येला सुरक्षित केले. राहुल गांधी देशाला सुरक्षित, समृद्ध करू शकतील का, असा सवाल करून, हे तर केवळ कुटुंबाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *