भिवंडी : अवकाळी पावसामुळे भिवंडीत नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर निवडणूक प्रचाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. दुपारी तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर ग्रामीण भागात हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्रच वातावरणात गारवा निर्माण झाला. कडक उन्हाळ्यात हैराण झाल्याने बच्चे कंपनीने मनसोक्तपणे पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात वीटभट्टी मालकांसह आंबा बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, भिवंडी शहरातील काही भागात गारा पडल्याचेही पाहायला मिळाल्या. शेतकऱ्यांसह वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे. तर अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरातील वीज गेल्याने शहरातील विविध भागात अंधार पसरला होता. यंत्रमाग कारखाने बंद झाल्याने कामगार वर्गदेखील पावसाचा गारवा अनुभवण्यासाठी बाहेर पडला.
