विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन
ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांच्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार, २३ जून, २०२४ रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी स. ११ ते दु. १ असा राहील. प्रवेश परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जून २०२४ पर्यंत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cdinstitute.net) उपलब्ध असलेल्या लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८८१४२१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय
प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते.
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना मासिक तीन हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते.
संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते.तसेच, सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित करण्यात येतात.
