मोखाडा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे.
मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
पंचनामे करण्याचे आदेश
दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.
