पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार आहेत. भारतीय जनता पक्ष पक्षात ७५ वर्ष पूर्ण केल्यावर महत्त्वाचे पद देऊ नये असा नियम आहे. हे लक्षात घेता आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपद कधी सोडणार? आणि त्यांच्या जागी अमित शहांना पंतप्रधान कधी करणार? असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी आज एका पत्र परिषदेत विचारला आहे. चेन्निथाला यांचा हा प्रश्न म्हणजे “आपले ठेवावे झाकून ,आणि शेजाऱ्याकडे पहावे वाकून,” अशा प्रकारचा म्हणावा लागेल. मुळात भारतीय जनता पक्षात वयाची ७५ वर्ष पूर्ण केल्यानंतर महत्त्वपूर्ण पदांवर राहू नये किंवा राजकारणात सक्रिय राहू नये असा कोणताही लिखित नियम असल्याचे आम्हाला तरी अद्याप माहीत नाही. असा नियम असता तर २०१४ मध्ये लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी प्रवृत्ती नेत्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली होती. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन हे दोन्ही नेते लोकसभेची निवडणूक लढले होते आणि विजयी देखील झाले होते.
भारतीय संस्कृतीमध्ये वानप्रस्थाश्रम म्हणजेच वृद्धापकालीन निवृत्तीची परंपरा मान्य केलेली आहे. त्यानुसार वयाची ७५ वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष उलटले की साधारणपणे त्या व्यक्तीने कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक कर्तव्य यातून मुक्त व्हावे आणि परमेश्वराचे नामस्मरण करत उर्वरित दिवस काढावे असे संकेत आहेत. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय संस्कृतीतील बहुतेक सर्व तत्त्व अंगीकारलेली आहेत. त्यामुळे त्याच तत्त्वावर भाजपचेही कामकाज चालते. याचा अर्थ अगदी ७५ पूर्ण झाले म्हणजे ७५ व्या वाढदिवसाला किंवा त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी तुम्हाला निवृत्त केले जाईलच असा होत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बहुतेक सर्व सरसंघचालक हे वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्या पदावर कायम होते. अर्थात डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे दोन सरसंघचालक वगळले तर नंतरचे बाळासाहेब देवरस, रज्जूभैया आणि सुदर्शनजी हे तीनही सरसंघचालक ज्यावेळी आपले वय आणि प्रकृती लक्षात घेता आपण कामाला न्याय देऊ शकणार नाही हे लक्षात आले, तेव्हा स्वतःहून आपल्या पदावरून पायउतार झाले होते, आणि नव्या नेतृत्वाकडे त्यांनी कार्यभार सोपवला होता.
दुसरा मुद्दा असा येतो की मोदींनी निवृत्त कधी व्हायचे याचा निर्णय एक तर ते स्वतः घेतील, किंवा त्यांचा पक्ष घेईल. त्यात काँग्रेस पक्षाने लक्ष घालण्याची खरोखरी काही गरज आहे काय? शेजाऱ्याच्या घरी नवरा बायको मध्ये किरकोळ वाद होतात हे बघून त्या नवरा बायकोने आता घटस्फोट घेतला पाहिजे असा परस्पर निर्णय आपणच घेऊन टाकण्यासारखा हा प्रकार म्हणावा लागेल.
त्यातही मोदींनंतर पंतप्रधानपद कोणाला द्यावे हा निर्णय देखील घेण्यास भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते सक्षम आहेत. आमच्या माहितीनुसार आज तरी त्या पक्षात पंतप्रधान कोणी व्हावे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोणी व्हावे यासाठी पक्षात वरिष्ठ स्तरावर काही भांडणे असल्याचे दिसत नाही. तरीही त्यांच्या पक्षात तशी भांडणे असलीच तर ते सोडवायला पक्षाचे सर्वच वरिष्ठ समर्थ आहेत. मोदींनी कधी निवृत्त व्हावे आणि त्यांच्यानंतर पंतप्रधानपद कोणाला द्यावे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. इथे मात्र रमेश चेन्निथाला अमित शहांना परस्पर पंतप्रधान ठरवून मोकळेही झाले आहेत.
पंतप्रधान कोणी व्हावे यासाठी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनभस अशी अनेक भांडणे होती. मात्र दीर्घ काळापासून पंतप्रधानपद हे नेहरू गांधी परिवाराकडेच सोपवले जात होते. त्यामुळे मग पक्षात वादावादी होऊन पक्ष फुटण्यापर्यंत वेळ आली होती. नेहरूनंतर मोरारजी देसाईंना संधी नाकारली आणि इंदिरा गांधींना पंतप्रधान केले गेले. त्याचे पर्यावसान १९६९ मध्ये काँग्रेस पक्ष दुभंगण्यात झाले होते. १९७७ मध्ये मोरारजी पंतप्रधान झाले, त्यावेळी चौधरी चरणसिंह, बाबू जगजीवनराम हे सर्व पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. इंदिरा गांधीनंतर ज्यावेळी राजीव गांधींना ते नवखे असतानाही अनेक लायक व्यक्तिंना बाजूला सारून पंतप्रधान केले गेले, त्यावेळी दुखावलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी नंतर काँग्रेस फोडून जनता दलाची स्थापना केली होती. ते पंतप्रधान झाले आणि जेमतेम १०-११ महिने टिकले. नंतर त्यांच्या पाठोपाठ चंद्रशेखर हे देखील औटघटकेचेच पंतप्रधान झाले होते. हे सर्व जुने काँग्रेसीच होते. आणि पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी तात्पुरते वेगळे घरठाव केले होते. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान कोणी व्हायचे यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. पी व्ही नरसिंहराव की शरद पवार यावर जोरदार खल होऊन शेवटी शरद पवारांना बाजूला सारले गेले होते. आपल्याला पंतप्रधान होता आले नाही हा सल अजूनही शरद पवार यांच्या मनात आहे आणि तो अधून मधून ठसठसतोही. पुन्हा पंतप्रधानपद मिळावे यासाठी शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला होताच ना. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपद मिळावे म्हणून जशा मारामाऱ्या झाल्या तशा मारामाऱ्या भाजपमध्ये अद्याप तरी झालेल्या दिसून आलेल्या नाहीत. १९९६ मध्ये ज्यावेळी भाजपची सत्ता आली त्यावेळी सर्वानुमते अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान बनले होते. त्यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पुढे आले. अडवाणींच्या नेतृत्वात पक्षाने दोन निवडणूकाही लढवल्या. मात्र जनतेने त्यांना स्वीकारले नाही. नंतर नरेंद्र मोदींचे नाव पुढे आल्यावर जनतेने हे नाव मान्य केले आणि तेव्हापासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. आज तरी मोदींना बाजूला करून मला पंतप्रधान करावे अशी मागणी पक्षात राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यापैकी कोणी केल्याचे बाहेर कानावर तरी आलेले नाही. पक्षात कदाचित कुरबुरी असतीलही. मात्र आज तरी त्या बाहेर आलेल्या नाहीत. अशावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यात लक्ष घालून केलेला हा अव्यापारेषु व्यापारच म्हणावा लागेल ना. आज तरी भारतीय जनता पक्षाला आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नरेंद्र मोदी हेच नाव नेतृत्वासाठी योग्य वाटत असावे, आणि त्यांच्या नावाला फारसा विरोध नसावा. असला तरी तो अद्याप बाहेर आलेला नाही. त्यामुळेच वर दिलेल्या चार-पाच जणांपैकी कोणीही मी भाजप सोडून तुमच्याकडे येतो मला पंतप्रधान करा अशी ऑफर काँग्रेसला किंवा इतर कोणत्याही पक्षाला किंवा सध्याच्या इंडी आघाडीला दिल्याचे कानावर नाही. यातल्या कोणीही आता भाजपात संधी नाही म्हणून नवा राष्ट्रवादी भाजप स्थापन करण्याचे प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही.मग काँग्रेस नेत्यांनी ही उठाठेव कशाला करायची ?भाजपमध्ये जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघात संस्कारित होऊन कार्यरत झालेले कार्यकर्ते आलेले आहेत, ते दीर्घकाळ खुर्चीला चिकटून राहत नाहीत असा अनुभव आहे. इथे स्वर्गीय नानाजी देशमुख यांचे उदाहरण देता येईल. नानाजींनी वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती, आणि समाजकारणात स्वतःला झोकून दिले होते. त्यांनी जिद्दीने उभा केलेला दिनदयाल शोध संस्थान प्रकल्प हा त्यांच्या निवृत्तीनंतरचेच फलित म्हणावे लागेल. नानाजींसोबतच त्या काळात साठी ओलांडल्यावर सुमतीबाई सुकळीकर यांनीही निवृत्ती घेत सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले होते. अजूनही अशी वेगवेगळी उदाहरणे शोधल्यास सापडू शकतील. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर महत्त्वाच्या पदावरून बाजूला व्हावे किंवा निवडणूक लढवू नये असे संकेत असले तरी वर नमूद केल्याप्रमाणे आडवाणी आणि जोशींनी निवडणूक लढवली होतीच. महाराष्ट्रात वयाचे ८० वर्षे पूर्ण केल्यावर सुधाकरपंत परिचारकांनी निवडणूक लढवली होतीच. रामभाऊ नाईक बनवारीलाल पुरोहित यांनाही राज्यपाल पदी नियुक्त केले आहेच. विशेष महत्त्वाचे म्हणजे आज तरी नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत. ज्यावेळी ते त्यामुळे आज ते निवडणूक लढवून पंतप्रधान होऊ शकतात. ज्यावेळी ते वयाची ७५ वर्षे पूर्ण करतील त्यावेळी काँग्रेसचे नेत्यांनी हा प्रश्न जरूर उपस्थित करावा. त्याचे उत्तर त्यावेळी त्यांना मागण्याचा अधिकार कदाचित असू शकेल. आज हा प्रश्न उपस्थित करण्याचे तसे काहीच प्रयोजन नाही.त्यावेळी देखील काँग्रेस पक्षातील नेत्यांना हा मुद्दा उपस्थित करण्याचा तसा काहीच अधिकार उरत नाही. हा पूर्णतः भाजपाचा अंतर्गत प्रश्न राहणार आहे. रमेश चेन्निथाला किंवा अन्य काँग्रेसच्या नेत्यांनी जर असा प्रश्न उपस्थित करायचाच असेल तर सर्वप्रथम त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आज वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेली आहेत, त्यावर बोलावे. त्यांच्या मित्र पक्षाचे नेते वयाची ८४ वर्ष पूर्ण केल्यानंतरही पद सोडत नाहीत म्हणून त्यांच्याच पुतण्याने बंड केले आहे, आणि पक्ष फोडला आहे. त्यावर बोलावे. जिथे लक्ष घालण्याची काहीही गरज नाही तिथे उगाचच शेजाऱ्याकडच्या भांडणात नाक खूप सून स्वतःचे हास्य करून घ्यावे यात काहीही अर्थ नाही. रमेश चेन्निथाला यांनी याचे भान ठेवावे, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *