रेवदंडा : मागील काही दिवसांपासून परिसरात हवामान बदलाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होत आहे.
यंदा तालुक्यात हवामानात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे शरीराची लाही लाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे हवेत मळभ दाटून आल्याने उष्म्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहानंतर ते सायंकाळी सहापर्यंत नागरिक घराबाहेर पडण्याऐवजी घरातच थांबणे पसंत करताना दिसून येत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. येथील अनेक समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र, वाढत्या उष्म्यामुळे पर्यटक लगेच परतत आहेत.
