एक लाख ७७ हजार मतदारांची नोंदणी, आयुक्‍त पी. वेलरासू यांनी दिली माहिती

वाशी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. सोमवार, १० जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ७७ हजार ३२ मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत उपायुक्त विवेक गायकवाड, उपायुक्त अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी १५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असल्‍याचे यावेळी सांगण्यात आले. बुधवार, २२ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करणे, शुक्रवार, २४ मे रोजी अर्जाची छाननी करणे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ मेपर्यंत राहणार आहे. १० जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबई शिक्षक-पदवीधर व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर या दोन मतदारसंघांसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

मतदारांची संख्या वाढविण्यासाठी मतदार नोंदणी १२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरचे अर्ज पदनिर्देशित ठिकाणी ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारले जातील. ऑनलाइनसाठी http://gterollregistration.mahait.org या लिंकचा वापर करा, असे कळविण्यात आले आहे. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले आहे. चोवीस तास तक्रार निवारण कक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *