ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली.
२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात युवावर्ग,स्त्री -पुरुष ,दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता.
ठाणे शहरात २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आणि लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन स्वीप पथकाने केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होवू नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे त्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 वर कॉल करून आपल्या शंकाचे निरसन करु शकतात असेही यावेळी सांगण्यात आले.
लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.