ठाणे : ठाण्यातील योग प्रशिक्षक आणि फिजिकल ट्रेनर निलीमा भडगावकर यांनी नुकत्याच संपलेल्या ४३ व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगीरी साधली आहे. मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र आयोजित या स्पर्धेत निलीमा यांनी स्वबळावर ४५ वर्ष अधिक वयोगटाच्या महिलांमध्ये १५०० आणि ८०० मित्र धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.तर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य आणि ४x१०० मीटर धावण्याच्या रिले स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.
सोमय्या अॅथलेटिक्स ट्रॅकवर १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निलीमा यांनी ६:५९:२ मिनिटे अशी वेळ नोंदवत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यानंतर ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निलीमा यांनी ३:२४:२ मिनिटे अशा वेळेसह स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आपल्या खात्यात जमा केले. २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निलीमाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या शर्यतीत निलिमाने ३७.२३ सेकंद अशी वेळ नोंदवली. ४ x १०० मीटर रिले स्पर्धेत ७३.९ सेकंदासह कांस्यपदक मिळवले.
योग्य प्रशिक्षक आणि फिजिकल ट्रेनर असलेल्या निलीमा यांनी पाच वर्षांपूर्वी मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत धावण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे कुठल्याही मार्गदर्शकाशिवाय निलीमा यांनी स्थानिक स्पर्धा ते राष्ट्रीय स्पर्धेपर्यत झेप मारली आहे. १० किलोमीटर अंतराच्या पिंकथॉन स्पर्धेपासून धावायला सुरुवात करणाऱ्या निलीमा यांनी वेगवेगळ्या अर्ध मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि ट्रायथलॉन स्पर्धेत स्पृहणीय यश मिळवले आहे. तन्वी आणि आईशा या दोन मुलींची आई असलेल्या निलीमा यांना पती मनोज यांनी नेहमीच प्रोत्साहित केले आहे. सध्या आयर्नमन स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या निलीमा यांना भविष्यात एव्हरेस्ट पर्वताला गवसणी घालायची आहे.