अशोक गायकवाड
अलिबाग : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दूषित आढळणाऱ्या पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
दूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर तसेच अन्य साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागा मार्फत नियमित पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५ हजार ६९१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजनांचे पाणी नमुने जमा करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, हे पाणी नमुने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, कर्जत, महाड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. येथे पाणी नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दूषित आढल्लेल्या पाणी नमुन्यांचे शुध्दीकरण करून, पुन्हा संबंधित पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत.
नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यासोबत इतर पाणी स्त्रोतांची गुणवत्ता टिकविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून राहिल्याने विहिरी, विंधन विहिरी तसेच इतर पाणी स्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. यामुळे या स्त्रोत परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. विहिरीं मधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच स्त्रोतांचे मजबुतीकरण करण्यात येईल. विहिरीच्या पाण्यात कचरा पडू नये यासाठी विहिरीवर झाकण किंवा जाळी टाकण्यात येणार आहे.