आकस्मिक वादळ व अकाली पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर
नवी मुंबई : काल सायंकाळी आलेल्या आकस्मिक वादळामुळे व पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्भवलेली आपत्तीजनक परिस्थिती तसेच मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली मोठे होर्डिंग्ज कोसळल्याची दुर्घटना याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज तातडीने दूरदृश्य प्रणालीव्दारे अधिकारीवर्गाची बैठक घेत शहरातील परिस्थिती जाणून घेतली तसेच कालचा प्रसंग लक्षात घेऊन आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे 24×7 सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
काल सायं. 4.05 पासून 5.35 पर्यंत ताशी 107 कि.मी. वेगाने वादळी वाऱ्यांसह अकाली पर्जन्यवृष्टी सुरु झाली. आयुक्तांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेची सर्व यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर मदत कार्यासाठी तात्काळ कार्यान्वित झाली आणि 8 वाजेपर्यंत वादळामुळे पडलेली झाडे व फांदया, दोन ठिकाणी वाकलेले विजेचे खांब, काही ठिकाणी उडालेले पत्रे यावर कार्यवाही करत रहदारीचे अडथळे दूर करुन जनजीवन सुरळीत करण्यात आले. महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावर तत्पर कार्यवाही झाल्याने आणि नागरिकांना बचाव व मदतीचा तात्काळ संदेश निर्गमित झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
तथापि या आकस्मिकपणे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीचा विचार करुन पूर्व खबरदारी घेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री.संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधत विभागनिहाय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला आणि मौल्यवान सूचना केल्या.
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याची घडलेली दुर्घटना लक्षात घेत नमुंमपा क्षेत्रातील अंतर्गत भागात तसेच महामार्ग, रेल्वे हद्द, एमआयडीसी भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे रचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या एकूण होर्डिेगची संख्या, त्यांचे आकारमान, त्यामधील परवानगी दिलेल्या होर्डिंगची संख्या याची माहिती त्वरीत संकलित करुन सादर करावी तसेच अधिकृत होर्डिंगवर ते अधिकृत असल्याचे चिन्ह प्रदर्शित करण्याची कार्यवाही करणे त्याचप्रमाणे अवैध/ अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वादळी वारे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीसमयी नागरिकांनी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला थांबू नये असे आवाहन व्यापक स्वरुपात प्रसारित करण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
होर्डिंगप्रमाणेच ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवर्सच्या सुरक्षिततेबाबतही सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. या वादळी कालावधीत अनेक ठिकाणी गच्चीवरील, घरांवरील पत्रे उडाले असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत काळजी घेण्याच्या सूचना सोसायटयांना व वसाहतींना देण्यात याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.
नमुंमपा क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई सुरु असून त्या कामाला गती देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी नाल्यातून काढला जाणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर त्वरीत उचलून नेण्याचे सूचित केले. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्त पाहणी करुन नालेसफाई पूर्ण करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
कालच्या अकाली पावसात मुकंद कंपनीजवळील रेल्वे ब्रीजखाली पाणी साठण्याची कारणमीमांसा जाणून घेत आयुक्तांनी त्याठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचा व्यास मोठा ठेवणेबाबत रेल्वेशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचे सूचित केले. यामध्ये तेथील रिटेनिंग वॉलबाबतही तत्पर कार्यवाही करण्याचे रेल्वेस सूचित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले.
सी-1 श्रेणीच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूर्वखबरदारी घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत साथरोग, मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे करण्याचे व आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्याचे तसेच याबाबत खाजगी डॉक्टर्सनाही सतर्क करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
पावसाळी कालावधीत पाणीपुरवठा शुध्द व पुरेशा प्रमाणात राहील याची दक्षता घेण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी उदयान विभागाने वाहतूकीला व रहदारीला अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांदया छाटण्याचे काम तत्परतेने पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले.
शहरात डेब्रिज आणून टाकले जाते अशा ठिकाणी विभाग अधिकारी यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले.
पावसाळापूर्व कामांना यापूर्वीच 15 मे ही डेडलाईन दिली असून येत्या एक ते दोन दिवसात सर्व कामे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत एमआयडीसी भागातील स्वच्छता आणि पुनर्पृष्ठीकरण कामांकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. कालच्या आपत्ती प्रसंगात नागरिकांना दिलासा देणारी तत्पर सेवा सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पुरविली याची नोंद घेत आयुक्तांनी अशाच प्रकारे यापुढील काळातही सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले.