कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न
अजित नैराळे, डॉ. शीतल रसाळ, आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न
अशोक गायकवाड
कर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार,( दि. १३ मे )रोजी पार पडले. यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० मिनिटांच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पाऊसामुळे अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर देखील परिणाम झाला आहे.ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली.
मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. अशात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर सोमवार,(दि. १३ मे) रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर शहरी भागात साधारण ११ नंतर तुरळक मतदार दिसत होते. ११ नंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील किरवली, हलिवली,कर्जत दहीवली, कशेळे, धामोते, नेरळ दहीवली, कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते. तर धामोते, कर्जत दहीवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील ८१ क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, १८९ कर्जत मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ %, दुपारी १ वाजेपर्यंत २९.४७ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.०३% तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान पार पडले. अशात दुपारी ३.३० वाजता अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला. साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे. मावळ मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवार, दि.१३ मे) रोजी मतपेटीत बंद झाले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल असणार आहे. तेव्हा या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले होते. ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली.