भाईंदर : सूर्या प्रादेशिक पाणी योजनेतून मिराभाईंदर शहराला गणेशोत्सवापर्यंत ४० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. शहराला यापुढे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड येथे दिले. महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली होती.

सभेला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, अभिनेत्री रूपा गांगुली आदी उपस्थित होते. मिरा-भाईंदर शहरात गेल्या दहा वर्षांत मेट्रो, सिमेंट काँक्रीट रस्ते, मलनिस्सारण केंद्र, भुयारी गटार योजना, उद्याने अशी अनेक विकासकामे करण्यात आली. त्यामुळे शहराचे रूप बदलले आहे. आता लवकरच सूर्या धरण योजनेच्या २१८ एमएलडीपैकी ४० एमएलडी पाणीही आगामी गणेशोत्सवापर्यंत देण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील कोस्टल रोड वांद्रेपासून वर्सोवा, मढ ते थेट उत्तनपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील दळणवळणाची सोय वाढणार आहे. मिरा-भाईंदरचा माणूस ३५-४० मिनिटांत कुलाब्याला पोहोचू शकणार आहे. आमच्या मागे नरेंद्र मोदींचे पाठबळ आहे, म्हणूनच ही कामे सरकार करू शकले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विरोधी पक्षांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी चेहराच नाही. म्हणून पाच वर्षांत पाच पंतप्रधान करण्याची भाषा ते करत आहेत. यात पहिला क्रमांक कोणाचा, यावर मात्र विरोधी पक्ष बोलायला तयार नाहीत. मोदींची विकास ट्रेन असून त्याला सर्व पक्षांचे डबे जोडलेले आहेत. त्यात गरीब, दलित, सर्वसामान्य अशा सर्वांसाठी जागा आहे, मात्र विरोधकांकडे केवळ इंजिनच असून त्यात वेगवेगळे चालक आहेत व सर्वसामान्यांना त्यात जागा नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *