मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल…

नवी दिल्ली : आज देशभऱात अनेक भुकेल्यांना जेवण मिळत नाही, त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था करावी. अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यांच्या नोकरीची काही व्यवस्था करावी. पण हे सोडून मोदींचा डोळा फक्त आणि फक्त सत्तेवरच आहे, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ते रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

२००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झाला, तेव्हा सोनिया गांधींनी आपल्या मित्रपक्षांच्या इच्छेविरुद्ध पंतप्रधान होण्यास नकार दिला आणि काँग्रेसच्या वतीने मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले. ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्यावर मोदींचा डोळा आहे, अशी टीकाही खरगेंनी केली.

ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, देशाचे भविष्य घडवणारी निवडणूक आहे. देशातील दलित, मागासलेले, आदिवासी, गरीब, शेतकरी यांना वाचवण्याची ही निवडणूक आहे. यात जर काही चूक झाली तर या देशात मनु जन्माला येईल आणि मनुस्मृतीची राजवट चालेल आणि संविधानाची राजवट संपेल. मोदी आणि भाजपला परत आणण्याचा प्रयत्न म्हणजे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, गरीब आणि शेतकरी यांचा विश्वासघात आहे. चुकूनही कोणी भाजपला मत दिले, तर ते अनुसूचित जाती, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात मतदान असेल, असेही खरगे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *