दिन विशेष
श्याम ठाणेदार
महाराष्ट्राचे लोककवी, शाहीर, आंबेडकरी चळवळीचे बुलंद कार्यकर्ते आणि समाज प्रबोधनकार वामन तबाजी कर्डक यांची काल म्हणजे १५ मे रोजी २० वी पुण्यतिथी होती. त्यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा विशेष लेख. वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देशपंडी या छोट्याशा खेड्यात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी तर आईचे नाव सईबाई असे होते. त्यांना एक मोठा भाऊ आणि एक धाकटी बहीण होती. वामनदादा यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उदरनिर्वाहासाठी दादा मिळेल ती कामे करू लागले. जत्रा यात्रांमधून कुस्ती खेळू लागले त्यातून जे पैसे मिळत त्यातून ते घरखर्च चालवू लागले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले पण त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य लाभले नाही. त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले पुढे मुलाचेही निधन झाले. इतके मोठे दुःख उराशी बाळगून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. बीडीडी चाळीत त्यांचे वास्तव्य असे तिथेच त्यांची सैनिक समता दल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी ओळख झाली. समता सैनिक दलातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. वामनदादांना लहानपणापासून गायनाची आवड होती. त्यांना मिळालेली प्रतिभा ही जन्मदत्त देणगी होती. लहानपणापासून गायनाची आवड असलेल्या वामनदादांकडे लेखणी, वाणी आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम होता. एक दिवस फावल्या वेळेत ते राणीच्या बागेत बसले असताना त्यांनी एका हिंदी चित्रपट गीताचे विडंबन केले. ते गीत त्यांनी राणीच्या बागेतील गर्दीपुढे म्हटले. त्यांचे हे विडंबन गीत उपस्थित लोकांना खूप आवडले. त्यांचा आवाज आणि गाण्याचे बोल लोकांना आवडू लागले. पुढे ते आंबेडकरी जलशांमध्ये गाऊ लागले. विशेषतः ज्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण असे त्याठिकाणी बाबासाहेबांच्या भाषणाआधी वामनदादांचे गाणे होत असे. बाबासाहेबांनी त्यांच्या गाण्याची स्तुती अनेकवेळा आपल्या भाषणांमधून केली आहे. बाबासाहेब म्हणत माझ्या दहा भाषणांचं काम शाहिरांचं एक गाणे करते. वामनदादांचे बहुतांश गीते हे लोकगीते आहेत. वामनदादांची गीते म्हणजे कोंडलेल्या मनाचा हुंकार. वामन दादांच्या गीतांचा केंद्रबिंदू हा मानव होता म्हणूनच वामनदादा म्हणतात मानवा इथे मी तुझे गीत गावे…. तुझे गीत व्हावे मानवता. आंबेडकर भक्ती, दलित, शोषित, स्त्रीमुक्ती, जातीव्यवस्था यावर वामन दादांनी आपल्या गीतातून प्रबोधन केले. दादांनी आपल्या गीतातून हुंडाबळी, ऊसतोड कामगार, पर्यावरण, कामगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ यावरही भाष्य केले. त्यांच्या गीतांचे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच होते. वामन दादांनी स्वतःला भीमकार्यात वाहून घेतले. दादांनी आपल्या असंख्य लोकगीतांतून लोकांना भुरळ घातली. म्हणूनच ते लोककवी झाले. दादांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारांची पताका आपल्या खांद्यावर खंबीरपणे वाहिली. आपल्या तेजस्वी लेखणीने आणि कणखर वाणीने फुले, शाहू, आंबेडकर घराघरांत पोहचवणाऱ्या या महाकवीचे १५ मे २००४ रोजी निधन झाले. लोककवी वामन दादा कर्डक यांना २० व्या पुण्यतिथीनमित्त विनम्र अभिवादन!