आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन
ठाणे : पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे. या मतदानामध्ये मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आदिवासींची मतसंख्या मोठी आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडून आदिवासी समाजाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे; अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी केले आहे.
अनिल भांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. या भागातील आदिवासींच्या जमिनींवर धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. कल्याण, मुरबाड, मलंगगड परिसर, शहापूर, भिवंडी भागातील अनेक वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा पोहचविण्यात शासनाला यश आलेले नाही. पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधा आदिवासींना मिळत नाहीत. याबाबत अनेक उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही. आदिवासी वाड्या वस्त्यांवर उमेदवार जाण्यास तयार नाहीत. म्हणजेच, आदिवासींचा विकास करण्याबाबत कोणतेही धोरण आखले जात नाही. एकूणच अनेकांनी आदिवासींना गृहीत धरले आहे. त्यामुळेच आता जे उमेदवार आदिवासी समाजाला मानसन्मान देतील, अशाच उमेदवारांना मत द्यावे. अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन अनिल भांगले यांनी केले.
