अनिल ठाणेकर 

ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या `नमो नम: वचननामा’ चे प्रकाशन गुरुवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे, शिवसेना प्रवक्ते राहूल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाइंचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

`वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे’ अशा शिर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या पाच वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांचा वाचनाम्यात संकल्प मांडला आहे.

जलद, सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणे, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, कळवा- ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे, लोकल फेऱ्या वाढविणे, १२ डब्यांची लोकल १५ डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, सर्व रेल्वे स्थानके स्मार्ट करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणे, मीरा भाईंदर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे वाचन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर येथे ४० हजार प्रेक्षक संख्येचे फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरातील कोंडीमुक्त, वेगवान प्रवासासाठी विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. ठाणे – बोरिवली हे अंतर २० मिनिटात पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित बोगद्याच्या कामाला चालना देणार आहे. प्रवास वेगवान होण्यासाठी मेट्रो ४ आणि ४ अ चे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळ ते संपूर्ण नवी मुंबई शहराच्या मेट्रो कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी वचननाम्यात दिले आहे. ठाणे हा देशातील पहिला झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रगत आणि स्मार्ट शहरांची भरारी अंतर्गत ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर शहरांचा सुनियोजित विकास करून या महापालिकांना जागतिक स्तरावर पोहोचविणे, पर्यावरण संवर्धन आणि प्रदुषणमुक्ती अंतर्गत शहरांचे ४० टक्के ग्रीन कव्हर वाढवून ते ६० टक्के करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विकास करताना आणि वारसा जपताना ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे स्थलांतर करून ऐतिहासिक वारशाचे जतन केले जाणार आहे. तसेच ऐतिहासिक संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवस=ष्टी उभारणार आहे. घोडबंदर येथे फिल्मसिटी उभारण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. मीरा-भाईंदरच्या समृद्धीसाठी समाजोत्थान योजना राबवली जाणार आहे. या महत्त्वाच्या वचनांप्रमाणेच नियोजन शहराचे, नागरिकांच्या हिताचे करत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटला (टीओडी) चालना दिली जाणार आहे.  वॉकिंग स्ट्रीट, सायकल ट्रक उभारणीला प्राधान्य दिले जाणार असून मतदारसंघात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता स्वतंत्र धरण उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  उद्योग-रोजगारांना वाढते बळ, नवी मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न आणि इतर अनेक कामे करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी वचननाम्यात नमूद करून २० मे रोजी धनुष्यबाण समोरील बटण दाबून आपणाला विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *