माहीत असावे…
मोबाईल गेमचं व्यसन अनेकांना असतं. त्यातही तरूण आणि लहान मुलांना याचं व्यसन लवकर लागतं. मोबाईलवर नवनवे गेम येत असतात आणि आधी त्याची सवय आणि मग त्यांचं व्यसन कसं लागतं हे कळतच नाही. फोर्टनाईट या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. या गेमचे परिणाम आणि दुष्परिणाम याबाबत चर्चा होत असली तरी घरातल्या लहान मुलांवर पडलेला त्याचा प्रभाव चिंतेचं कारण असू शकतो. या गेम्सच्या स्वरूपामुळे लोकांना त्यांची सवय लागून जाते. गेम खेळल्याशिवाय चैन पडत नाही. गेम खेळताना आयुष्यातल्या इतर गोष्टी मागे पडतात. मुलं अभ्यास करत नाहीत, घरातली कामं करत नाहीत. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. खाण्याकडे त्यांचं लक्ष नसतं. घरच्यांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जात नाहीत. महत्त्वाचं म्हणजे मैदानी खेळ खेळत नाहीत. या सगळ्याचा त्यांच्या जडणघडणीवर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
या गेम्सचं व्यसन जडलं की मुलांची बरीच सामाजिक कौशल्यं कमी होतात. महत्त्वाची बाब म्हणजे मुलांचा इतरांशी असलेला संवाद कमी होतो. माणसांची आपल्याला गरज आहे असं मुलांना वाटत नाही. या गेम्सचा वापर मुलांची कौशल्यं वाढवण्यासाठी करता येतो. स्मरणशक्ती वाढवणं, एकाग्रता वाढवणं, भाषाज्ञान यासाठी गेम्सचा वापर करता येऊ शकतो. या गेम्सचा वापर मर्यादित काळासाठी केला तर ही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतात. मुलांना लागलेलं मोबाईल गेमचं व्यसन किंवा सवय ही अनेक पालकांंची समस्या असते. यावर उपाय शोधण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. मुलांना लागलेलं मोबाईल गेमचं व्यसन कमी करण्यासाठी काय करता येईल याविषयी जाणून घ्यायला हवं.
मुलांचा गेम खेळण्याचा वेळ कमी करायला हवा. त्यांचं गेम खेळणं एकाएकी पूर्णपणे थांबवू नका. पण हळूहळू वेळ कमी करा. मुलांना इतर गोष्टींमध्ये रमवा. मुलांना विविध प्रकारची गॅझेट्स वापरू देऊ नका. मोबाईलवर मुलं कोणते गेम्स खेळतात ते बघा. व्यसन जडण्यासारखेे गेम्स त्यांना खेळायला देऊ नका. शारीरिक मेहनत करावी लागेल अशा गेम्सची निवड करा. मुलांना वेळ द्या. त्यांच्याशी बोला. इतर छंद जोपासायला मदत करा. मुलं कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवतील ते बघा. लहान वयाच्या मुलांना मोबाईल हाताळू देऊ नका. गेम्सचं जडलेलं व्यवसन किंवा सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या. मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन लागल्याने वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.
मुलांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मुलं हिंसक आणि हट्टी बनू शकतात. त्यामुळे मुलांची ही सवय वेळीच सोडवा.