जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अशातच शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांकडून विनाकारण नोटीसा पाठविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच या नोटीसा मागे न घेतल्यास आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.

येत्या २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ठाणे पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने ऐन निवडणुकीच्या काळात १४४ – २ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १५ ते १९ मे पर्यंत फिरकू नये असे सांगितले जात आहे. परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींवर नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

त्याचा एवढाच गुन्हा आहे की तो निवडणुकीत प्रभावी ठरू शकणार आहे, त्यामुळेच त्याच्यावर नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीसा बजावल्या जात नाहीत. केवळ अशा पध्दतीने टारगेट करुन त्याला ऐन निवडणुकीच्या काळात घराबाहेर काढण्याचाच हा प्रयत्न असून पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

परंतु ज्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, करा तुम्हाला काय कारवाई करायची आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात निवडणुक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी अन्यथा उलटी पावले उचलावी लागतील, वेळ प्रसंगी बंद पाळावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *