बदलापूर : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने कुळगाव-बदलापूर शहरात गुरुवारी काढलेल्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प करीत उत्साह व जल्लोषात महायुतीच्या प्रचारासाठी निघालेल्या कुळगाव-बदलापूरच्या रॅलीत जनसागर उसळला होता. बदलापूर शहरातील पूर्व भागापाठोपाठ पश्चिम भागातील बदलापूरवासियांनी महायुतीच्या कार्याला पसंती देत ठिकठिकाणी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरामध्ये जय श्रीराम व मोदी… मोदी…च्या घोषणांमध्ये वातावरण दुमदुमून गेल्याने कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला विजय यात्रेचे स्वरुप आले होते.
माऊली चौकातून सुरू झालेला महायुतीचा हा झंझावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोचला. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील घोरपडे चौक, उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन, सानेवाडी, झेंडा चौक, पृथ्वी बिल्डिंग, रितू वर्ल्ड, स्वामी समर्थ चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पोचला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महायुतीच्या नेत्यांनी वंदन केले. या वेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले, प्रभाकर पाटील, भाजपाचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर, राजेंद्र घोरपडे, पूर्व विभागाचे अध्यक्ष संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली, मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर, आरपीआयचे शहराध्यक्ष धनराज गायकवाड आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीच्या आजच्या रॅलीमुळे बदलापूरकरांचे प्रेम व विश्वास अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील हजारो नागरिकांना विकासाची प्रचिती आली. त्यामुळे आजच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रेमाबद्दल नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीना विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीला महायुतीच्या हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
