रमेश औताडे 

मुंबई :काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे.

दाढी केली नाही…भर दंड,  बुटाची लेस सुटली..भर दंड, अपुऱ्या मनुष्यबळ अभावी  डबल शिफ्ट करून नाईट शिफ्ट करताना डुलकी लागली तर …भर दंड, सुरक्षा पॉईंटच्या ठिकाणी उपस्थित न राहणे…बुट फाटलेले या व  इतर अनेक प्रकार मुंबई पालिकेतील मुख्य सुरक्षा अधिकारी अजित तावडे करत असल्याने सुरक्षा रक्षकांनी युनियन च्या मार्फत औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे.

बेकायदेशीररित्या भरमसाठ दंड आकारण्यात येत असल्याच्या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरुन दि म्युनिसिपल युनियनने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे.

सद्या मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर भरमसाठ दंड आकारण्यात येत असल्याने तावडे यांच्या विरोधात सुरक्षा रक्षका मध्ये संतापाची लाट उसळली आहे.

3 ते 5 हजार रुपये दंड गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षकांना आकारण्यात येत असून सुरक्षा रक्षकांना आकारण्यात आलेला दंड हा बेकायदेशीर आहे, असे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.

सुरक्षा रक्षकांना जो दंड आकारण्यात येत आहे, तो कोणत्या नियमावलीच्या आधारावर आहे. तसेच दंड आकारताना कोणत्याही प्रकारची चौकशी पूर्ण न करता कोणत्या निष्कर्षाच्या आधारावर भरमसाठ दंड आकारला जात आहे, असे आम्ही प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि उपायुक्त किशोर गांधी यांची भेट घेऊन संबंधित प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता, असे बने यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात आमच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आम्ही सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी वरुन दि म्युनिसिपल युनियनने औद्योगिक न्यायालयात धाव घेतल्याचे बने यांनी सांगितले.

याबाबत प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी  सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारचा भरमसाठ दंड आकारत नसून नियमानुसारच दंड आकारत आहे.

पालिकेत सुरक्षा रक्षक कमी आहेत.खाजगी सुरक्षा रक्षक अपुरे आहेत.आहे तेच दोन दोन पाळीत काम करत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक हे सरकारी सुरक्षा मंडळ  1981 च्या कायद्याप्रमाणे काम करत नाहीत. त्यांच्या मालकाची व पालिका सुरक्षा अधिकारी यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप पालिका सुरक्षा रक्षक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *