‘ठाण्यात कुष्ठरूग्ण घोटाळा’
अनिल ठाणेकर
ठाणे : स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेमध्ये “कुष्ठरूग्ण” घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे पूर्वेकडे असलेल्या कोपरी विभागात फक्त १०० ते १५० कुष्ठरूग्ण असताना सुमारे ७१० जणांना ठाणे महानगर पालिकेकडून प्रत्येकी २४ हजार रूपयांचा निधी वाटप केला आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोपही जेया यांनी केला आहे.
अजय जेया यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळविली आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील गांधीनगर ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरुग्णांना दरवर्षी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून, प्रत्येकी २४ हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, या भागात शंभर ते सव्वाशे कुष्ठरूग्ण असताना ७१० कुष्ठरुग्णांची नावे लाभार्थी म्हणून यादीत समाविष्ट केली आहेत. साधारणपणे ३५० जणांचे बोगस प्रमाणपत्रे बनवून, त्यांच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुष्ठरोग निधीच्या नावाखाली, गेल्या अनेक वर्षांपासून, ठाणे महानगरपालिकेची फसवणूक करण्यात येत असून, यामागील खरे सूत्रधार ठाणे शहराचे माजी महापौर आणि ठाणे लोकसभेचे विद्यमान उमेदवार नरेश म्हस्के हेच असल्याचा थेट आरोप अजय जेया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
दरम्यान, या घोटाळ्यासंदर्भात अधिक माहिती देताना समाजसेवक अजय जेया पुढे म्हणाले की, नौपाडा कोपरी प्रभाग समितीत काम करणारे अधिकारी अकबर शेख , नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार, कुष्ठरोग निधी मिळण्याबाबतचे अर्ज लाभार्थ्यांना वितरित करतो, त्यानंतर याच परिसरात वास्तव्यास असणारा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) कर्मचारी असणारी ॲलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती यादीतील सर्व लाभार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र बनवते. त्याबाबतचा मोबदला तो रोख पैशाच्या स्वरुपात घेतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर, ७१० लाभार्थ्यांपैकी अवघ्या १०० ते १५० कुष्ठरुग्णांना 24हजार रुपये दिले जातात . या कामी शिंदे गटाचे शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख व महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप अजय जेया यांनी केला.
याप्रकरणी शासनाचे कुष्ठरोग विभाग, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, कुष्ठरोग निधी घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार नरेश म्हस्के यांच्यावर कठोर, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी समाजसेवक अजय जेया यांनी केली आहे.
