स्वाती घोसाळकर

मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यांनी गाजले. बेकारी, महागाई विषय शिवाजीपार्कवरून गायब होते तर बीकेसीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदुत्व , मराठी माणूस हे हक्काचे शब्द गायब होते. मुंबईत वानखेडेवर आयपीएलची मॅच हाऊसफुल सुरु असतानाच शिवाजीपार्क आणि बीकीसेही गर्दीने ओसंडून वाहत होते… एकुणच मुंबईत या राजकीय विचारांचा इतका धुराळ उडाला की सायंकाळी उशीरा मुंबईत पावासानेही रिमझिम हजेरी लावली. उद्या शनिवारी १८ मेला सायंकाळी पाचवाजता प्रचार थंडावणार असून सोमवारी २० मेला मुंबई, ठाणेसह नाशिकमध्ये लोकसभेच्या एकुण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.

मोदींचे पवारांना चॅलेंज

शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजीपार्कवरील सांगता सभेतून शरद पवारांना चॅलेंज दिले. शरद पवार यांनी राहुल गांधीकडून वीर सावरकर यांच्याबद्दल आयुष्यभर अपशब्द बोलणार नाहीत, असा शब्द घेऊन दाखवा, मला माहितीय तो शब्द राहुल गांधी देणार नाहीत, कारण निवडणुका संपताच ते पुन्हा वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार आहेत, असे सांगत अशा या दुतोंडी इंडिया आघाडीपासून मुंबईकरांनी सावध राहीले पाहिजे, मुंबईकरांना मी त्यांचा हक्क द्यायला येथे आलो आहे, २०४७ सालच्या विकसित भारताचे स्वप्न घेऊन आलोय अशी साद नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना घातली.

एनडीएच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून नवी दिल्लीला पाठवा असे भावनिक आवाहनही मोदींनी यावेळी मुंबईकरांना घातले. या उमेदवारांना दिलेले मत म्हणजे मोदीला दिलेले मत आहे असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदीं यांच्या सभेला मनसेचे राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारही उपस्थित होते.

 नकली शिवसेनेचं जेवढं परिवर्तन झालंय, तेवढा बदल देशातील कुठल्याच पक्षात आजपर्यंत झाला नाही, अशी टीकाही मोदींनी उद्धव ठाकरेंवर केला. शिवतिर्थच्या या भूमीत कधीकाळी बाळासाहेब ठाकरे व वीर सावकरांचा आवाज घुमत होता. मात्र, आज विश्वासघाती आघाडीला पाहून त्यांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल. नकली शिवसेनावाल्यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला, सत्तेसाठी ते राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी हे मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले, असा आरोपही मोदींनी ठाकरेंवर केला.

इंडी आघाडीकडे काय आहे, जेवढी माणसं तेवढ्या घोषणा. इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना तुमची संपत्ती देऊ शकणार नाहीत, तुमच्या संपत्तीतील निम्मा हिस्सा त्यांचं सरकार घेणार आहे. व्होट जिहाद वाल्यांना ती संपत्ती देण्याचं काम ते करणार आहेत. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. देशातील लाखो गुंतवणूकदार आज मार्केटसोबत जोडले आहेत. पण, इंडी आघाडीवाले जे कट रचत आहेत, त्यांचा उद्देश देशातील गुंतवणूकदारांचा हा विश्वास तोडण्याचं काम करत आहे, असे म्हणत इंडिया आघाडीच्या धोरणांवर व जाहिरनाम्यावर मोदींनी हल्लाबोल केला.

राज ठाकरेंच्या दहा मागण्या

मोदींसोबत पहिल्यांदाच निवडणूकीचे व्यासपीठावर एकत्र येणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्या छोटेखाणी भाषणात नरेंद्र मोदींसाठी एनडीएला मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. पवार, उद्धव ठाकरेंवर माझ्या आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बोललेत, जे निवडणूच येणार नाही त्यांच्यावर काय बोलायचे. म्हणून मी मोदींकेड यानिमित्ताने काही मागणी करतोय. पंतप्रधानपदाच्य तिसऱ्या टर्ममध्ये त्या ते पुर्ण करतील असा मला विश्वास आहे असे ठाकरे म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आपली पहिली मागणी असल्याचं राज यांनी म्हटलं.

अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठा करा. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत.  गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करा. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल.  गेली 18-19 वर्षे मुंबई-गोवा महामार्ग तसाच आहे. तो लवकरात लवकर पुर्ण कार. ही माझी विनंती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सविंधानांना तुम्ही धक्का लावणार नव्हताच पण विरोधकांच्या कांगावा उघड करून तुम्ही धक्का लावणार नाही, हे खडसावून सांगा. देशात काही मुठभर मुस्लिम आहेत, ओवैसीसारख्या औलादी आहेत, त्यांचे जे अड्डे आहेत, ते अड्डे तपासून घ्या. तिथे देशाचे सैन्य घुसवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशातील माझ्या माय भगीनींना सुरक्षित वावरता येईल. आणि सगळ्यात शेवटी  मुंबई रेल्वेकडे लक्ष द्या, तीच्या सुधारणेसाठी जास्तीत जास्त पैसे द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र

मोदींना तडीपार करणारच- ठाकरे

बीकेसी : हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, तो शाह मोदी आणि अंबानीचा कदापी होऊ देणार नाही. दहा वर्ष ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना कायमचं तडीपार करण्याची हीच वेळ आहे. मोदी, शहा भाडोत्री फौज घेऊन या उद्धव ठाकरेला संपवण्यास आलेत, प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचं राजकारण याच मातीत गडल्याशिवाय राहणार नाही असा एल्गार बीकेसीच्या इंडिया आघाडीत उद्धव ठाकरेंनी पुकारला. मुंबईतील इंडिया आघाडीच्या या सांगता सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, आपचे अरविंद केजरीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जनता असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी या सांगता सभेत केली केली. देशाला तोडण्याचे काम भाजपने केले त्यांना जोडण्याचे काम राहुल गांधींनी केले. मणिपूरमध्ये महिलांना जिवंत जळण्याचे काम सुरु असताना त्यांचा आवाज पोहचू नये, यासाठी भाजपने प्रयत्न केले. तो सुद्धा आवाज घेऊन राहुल गांधींनी मणिपूर ते मुंबई पदयात्रा केली. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. मोदींनी मागील निवडणुकीत केवळ चौदा सभा घेतल्या. आता मात्र सभांवर सभा घेत आहेत. रोड शो ला गर्दी नाही म्हणून गुजरातमधून लोकं आणली गेली. घाटकोपर घटनेची संवेदनशीलता पंतप्रधान मोदींनी दाखवली नाही. असा संवेदनाशुन्य भाजपा आघाडीला पुरते नेस्तनाबूत करा असे आवानही ठाकरे यांनी यावेळी केले.

मोदींच्या हुकुमशाहीविरोधात

एकजुठ होऊया- केजरीवाल

बीकेसी : नरेंद्र मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर जसे मला त्यांनी तुरंगात टाकले तसे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनाही तुरुंगात टाकतील. म्हणून ज्यांचे ठाकरें आणि शरद पवांरावर प्रेम आहे त्यांनी मोदींना नाकारले पाहिजे. मोदींच्या हुकुमशाहीविरोधात आपण सगळ्यांनी आता एकजुट होऊया, आणि आपला निर्धार मतपेटीतून दाखवून देऊया असेही केजरीवाल म्हणाले.

पहिल्या चार टप्यात मी एक व्हिडीयो क्लीप पाहिली. ज्यात तो वृद्ध म्हातारा म्हणतोय की मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान केले. कोणत्या चिन्हावर मतदान केले तर घड्याळ्यावर असे तो म्हणाला. हे एकुण मला दुख झाले. आणि म्हणून येथे आलेल्या प्रत्येकाने घरोघरी शिवसेनेचे मशाल आणि राष्ट्रवादीचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोहचविले पाहिजे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

मी दिल्लीकरांची वीज मोफत केली. मी गरिबांसाठी शाळा काढल्या, मोहल्ला क्लिनिक सुरू केलं. परंतु, त्यांनी माझ्यासारखं काम करण्याऐवजी मला तुरुंगात टाकलं. मोदींची भाजपा ही बाबासाहेबांच्या संविधानाविरोधी आहे, असे सांगत संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *