वीजपाणी नॉट रीचेबलमुळे पर्यटनावर परिणाम

माथेरान : मागील तीन दिवसांपासून माथेरान मध्ये वीज आणि पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने ऐन सुट्टयांचा हंगाम असताना याचा पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यातच ई रिक्षांना चार्जिंग नसल्याने ही सेवा सुध्दा कोलमडून गेली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा दूरवर शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागली आहे.शारलोट लेक येथे जनरेटर असताना देखील त्याचा वापर न केल्यामुळे पाणी पुरवठा केला गेला नाही. तर संध्याकाळच्या दरम्यान तीन दिवस सतत वादळी वारा आणि पाऊस यामुळे नेटवर्किंग सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आणि सततच्या विजेच्या लपंडावामुळे उष्मां अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे येथील हॉटेल धारकांना मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हॉटेल धारक कधीच स्थानिकांनी उभारलेल्या आंदोलनात अथवा ग्रामस्थांशी हितसंबंध ठेवत नाहीत. मुळात त्यांची अनधिकृत वाढीव बांधकामे असल्याने हॉटेल धारक शासनाच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. त्यांना मुबलक पाणी पुरवठा केला जातो आणि गावातील नागरिकांना पाण्यावाचून दिवस काढावे लागतात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे पण पदाशिवाय इथली नेतेमंडळी पुढाकार घेत नाहीत हे दुभाग्यच म्हणावे लागेल असे स्थानिक बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *