भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) होत असलेल्या मतदानासाठी मिरा-भाईंदरमधील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

शहरात मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे. या दोन्ही मतदारसंघात मिळून सुमारे ११७ ठिकाणी ६८१ मतदान केंद्रे आहेत. विशेष म्हणजे यातील एकही केंद्र संवेदनशील नाही. संपूर्ण परिसराचे पोलिस बंदोबस्ताच्या दृष्टीने २६ विभाग करण्यात आले आहेत. या सर्व विभागांसाठी मिळून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील १०६ अधिकारी, ७४२ कर्मचारी, १६२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, ८०० होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र दलाचे २०० जवान असे सुमारे २,७१९ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त ६७६ पोलिस कर्मचारी आणि ३३ अधिकारी अन्य ठिकाणाहून मागविण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी, होमगार्ड नियुक्त केला जाणार असून त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नजर असणार आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ३५ वाहने व पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल अथवा वाहन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या मनाई क्षेत्रातील दुकाने, त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिक आस्थापनाही मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात सुमारे १९६ बंदुकीचे परवाने देण्यात आले आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बंदुका पोलिसांकडून जमा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणुकीची खबरदारी म्हणून गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हे दाखल असणारे अथवा संशयित गुन्हेगार अशा ५०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त याआधीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गुन्हे प्रवृत्तीच्या नऊ व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *