मुंबई : देशवासीयांना खुषखबर आहे. यंदा लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. अंदमान निकोबार व केरळात मान्सून पोहोचण्यासाठीची आवश्यक स्थिती तयार झालीय. पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी अगोदरच सुरु झाली आहे. मान्सून आगमनासाठी 10 मे पासूनच पूरक गोष्टी घडत आहेत. त्यामुळं मान्सून वेळेच्या आधीच केरळात पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती जाहीर केली आहे. गेल्या २४ तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, जरी मान्सून या भागात दाखल झाला असला तरी केरळमध्ये मान्सून ३१ मे ते ३ जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सरासरीपेक्षा अधिक मान्सून होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी पावसानं चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळं यावर्षी राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.