प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर
अनिल ठाणेकर
ठाणे : पुनर्विकास रखडल्याने वर्तकनगर येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आता या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नं. १२ इमारतीचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. पाठपुरावा करूनही विकासक दाद देत नव्हता. अखेर येथील ३२ कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी राजू फाटक यांनी विनंती करत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट करून दिली. आमदार प्रताप सरनाईक यांनी रहिवाशांच्या बैठकीत विकासकाला फोन केला. विकासकाने येत्या ८ दिवसात रहिवाशांशी चर्चा करतो असे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी या रहिवाशांना लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर रहिवाशांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शब्दाला मान देऊन मतदान बहिष्कार निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
