3 दिवसात 31 आकाराने मोठे होर्डींग हटवले – वाशीगावाजवळील अवाढव्य होर्डींगचाही समावेश

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डींगविरोधी धडक मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सलग तिस-या दिवशीही प्रभावीपणे राबविण्यात येऊन मोठ्या आकाराचे 10 होर्डींग निष्कासित करण्यात आले.

मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने बैठक घेत परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क राहून कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागामार्फत लगेचच अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई सुरू करण्यात आली.

अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांच्या समुहाने धडाकेबाज कारवाई करीत पहिल्या दिवशी सायं. 6 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत नमुंमपा क्षेत्रातील 15 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग निष्कासित केले. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अथक कारवाई करीत 6 मोठे होर्डींग हटविण्यात आले.

ही अनधिकृत मोहीम तिस-या दिवशीही तितक्याच तीव्रतेने चालू ठेवत 18 मे रोजी पहाटेपर्यंत 10 मोठे होर्डींग सुरक्षितपणे निष्कासित करण्यात आले असून सलग 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले आहेत.

17 मे पासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहीमेत सायन पनवेल रोडनजिक वाशीगाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डींग हटविण्याची कारवाई 2 दिवस अहोरात्र काम करून करण्यात आली असून त्याठिकाणचे 4 होर्डींग निष्कासित करण्यात आले आहेत.

नेरूळ विभागातही हर्डिलिआ कंपनीनजिक सायन पनवेल रोडशेजारी लक्ष्मीवाडी या ठिकाणी असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आलेले आहेत. ऐरोली विभागात ऐरोली – पटनी रोड येथील पदपथावर असणारे सेक्टर 20 येथील होर्डींग तसेच ऐरोली सेक्टर 9 दिवागाव येथे वंदना अपा. येथील होर्डिंग अशी 2 मोठी अनधिकृत होर्डींग हटविण्यात आलेली आहेत.

त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील रबाले रेल्वेस्टेशन समोर मोनार्क हॉटेल नजिक असलेले अनधिकृत होर्डींगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे अनिधकृत होर्डींग विरोधातील धडक मोहीमेत तिस-या दिवशी 10 मोठे अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले असून त्यामध्ये वाशीगाव येथील प्रचंड मोठ्या होर्डींगचाही समावेश आहे.

अशाप्रकारे 15 तारखेपासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग हटविण्याची कारवाई करण्यात आली असून होर्डींग काढताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासोबतच हायवे लगतची मोठी होर्डींग काढताना रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचीही काळजी घेत अशा ठिकाणची होर्डींग मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत काढण्यात आली आहेत.

ही अनधिकृत होर्डींग विरोधातील कारवाई आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार अशीच कार्यान्वित राहणार असून प्रसंगी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची प्रत्यक्ष अंमलबजावणी अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त व सर्वच विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी आणि कामगार करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *