अशोक गायकवाड
अलिबाग :रोहा तालुक्यातील दापोली गावचे रहिवासी व अलिबाग येथे वास्तव्यास असलेले, सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम २७ मे ला दुपारी आंध्र प्रदेशातील ‘ तिरुपती तिरुमाला देवस्थान’ येथे सादर होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे.
तिरुपती देवस्थान तर्फे प्रायोजित या भजनाचे थेट प्रक्षेपण ‘एस व्ही बी सी’ या चॅनेल वर ” नाद निराजमन ‘ या कार्यक्रमातून दुपारी ठीक ३:१० ते ४:३० वा. पर्यंत सादर होणार आहे.जेष्ठ भजन गायक पं. हरिश्चंद्र बुवा लोणारकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित संगितबद्ध केलेल्या विविध भजन रचना या कार्यक्रमात सादर केल्या जातील. समर्थ बुवांना हार्मोनियम वर साथ नरेशबुवा कडू, तबला साथ जगदीश पाटील-लोणारकर करतील . तरुण , होतकरू कलाकार विराज म्हात्रे ( मानी ) हे पखवाज वर साथसंगत करतील. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. अनेक प्रतिष्ठित देवस्थान ठिकाणी या मंडळाने भजन सेवा सादर केल्या आहेत. श्रीविठ्ठल रखुमाई देवस्थान पंढरपूर, श्री अंबाबाई देवस्थान कोल्हापूर, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, ख्वाजा हजरत मोईनउद्दीन चिस्ती दर्गा अजमेर- राजस्थान, श्री अगस्ती आश्रम अकोले, महर्षी चांगदेव देवस्थान पुणतांबा, ई. चा समावेश आहे. तिरुपती देवस्थान मध्ये कार्यक्रम सादर करण्याची ही सहावी वेळ असून मुख्य रंगमंचा वर तिसऱ्यांदा मिळालेल्या या भजन संधी बद्दल वायशेत येथील श्री. गंगादेवी भजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देवस्थान चे आभार व्यक्त केले आहेत व अधिकाधिक भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
