महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या पुण्यात रवीवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात कायदा ठार झाला आहे. एका बढे बाप का बेटा जो अल्पवयीन आहे दारूच्या नशेत दोन माणसांना बेदरकार ड्रायव्हिंग करून ठार मारतो. एकतर अल्पवयीन, त्यात दारूच्या नशेत असे असताना त्याला अटक करुन बालसुधारगृहात पाठवविणे गरजेचे पण पुण्यातील बढे बिल्डरने एका राजकारण्याला हाताशी धरतो आणि आपल्या गुन्हेगार मुलाला ८ तासात जामीन मिळवून देतो. कायद्याचा खून करणारा हा संतापजनक प्रकार पुण्यात घढला आहे.
रविवार दिनांक १९ मे च्या पहाटे २च्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरात झालेल्या या भीषण अपघातात मोटरबाईकवरून जाणाऱ्या एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास २ कोटी रुपयाच्या महागड्या कारमध्ये येणाऱ्या या अल्पवयीन कारचालकाने हा अपघात केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारचालकाचे वय १७ वर्ष ८ महिने इतके आहे. आपल्या देशातील विद्यमान कायद्यानुसार वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. हा परवाना घेण्यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात. हे बघता सदर अल्पवयीन कारचालकाकडे कोणताही परवाना नव्हता हे स्पष्ट दिसते आहे. अशावेळी या कारचालकाला कार चालवू देणारे कारचे मालक हे देखील तितकेच दोषी ठरतात. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांची आहे. आणि कार चालवणारा त्यांचा अल्पवयीन हा विशाल अग्रवाल यांचा मुलगाच होता. त्यामुळे अल्पवयीन मुलाला परवाना नसताना कार चालवायला देणारे पालक हे देखील या प्रकरणात तितकेच दोषी आहेत.ज्या कारने अपघात झाला त्या कारला दोन्ही बाजूंनी नंबर प्लेट्स नव्हत्या अशी माहिती मिळाली आहे. हे बघता त्या कारची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालीच नसावी असा निष्कर्ष काढता येतो. बरेचदा नवीन वाहन घेतल्यावर त्यांची नोंदणी होईपर्यंत देखील वाहन खरेदीदाराला दिले जाते, मात्र अशावेळी अस्थाई नोंदणी क्रमांक वाहनाला दिला जातो, आणि असा क्रमांक वाहनावर लिहिणे गरजेचे असते. सदर प्रकरणात तसेही झालेले दिसत नाही. म्हणजेच हे वाहन देखील बेकायदेशीररित्या रस्त्यावर आणलेले असू शकते.
सदर कारचालक हा मद्य प्राशन करून होता अशी माहिती मिळते आहे. हा कारचालक आणि त्याचे दोन मित्र रात्री उशिरापर्यंत कोणत्यातरी बार मध्ये किंवा पब मध्ये बसून मद्य प्राशन करीत होते आणि रात्री उशिरा मद्य प्राशन करून ते वाहन चालवत निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडीयावर आले आहे. अपघात घडताच सदर कारचालकाने तिथून कारसकट पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक करून लगेचच न्यायालयासमोर उभे केले. सदर कारचालकावर पोलिसांनी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे त्याला बाल सुधार गृहात पाठवणे गरजेचे होते. मात्र गुन्हा घडल्याला बारा तास होण्यापूर्वीच त्याला जामीन मिळालेला आहे. या कथित अल्पवयीन आरोपीचे वडील प्रसिद्ध बिल्डर असल्यामुळे त्यांनी वकिलांची फौज उभी करून हा जामीन मिळवला असणार यात शंका नाही. मात्र त्यामुळे जनसामान्यात नाराजीची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या पालकांनी एका राजकारणी नेत्याला हाताशी धरून प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जाते आहे. आरोपी कार चालवत नव्हता असे दाखवण्याचाही प्रयत्न होतो आहे अशीही माहिती मिळते. १८ वर्षाचे वय होईपर्यंत परवाना दिला जात नाही. परवाना असेपर्यंत वाहन चालवता येत नाही. तरीही आज देशभरातील रस्त्यांवर कितीतरी अल्पवयीन विनापरवाना स्वयंचलित वाहने चालवताना दिसतात. अशा अल्पवयींनांना परवाना नसताना पालकांनी वाहन देणे बेकायदेशीर आहे. मात्र आम्हाला आमचे अल्पवयीन लेकरू स्कुटी किंवा कार कशी छान चालवते हे सांगण्यात अभिमान वाटतो. त्यावेळी आम्ही कायदा मोडतो आहोत हे आम्ही विसरतो.
जो प्रकार वाहन चालविण्याचा आहे, तोच प्रकार मद्यप्राशन करण्याबाबतही आहे. मद्यप्राशन हे कायद्याने आणि सामाजिक संकेतानुसार निशिद्धच मानले गेले आहे. मात्र आज २१ व्या शतकात मद्य प्राशन हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेले आहे. सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी बाहेरून मद्यप्राशन करून घरी आल्यावर तोंड लपवून घरात यावे लागत असे. आज परिस्थिती बदलली आहे. आज पालक मुलांसमोर घरातच मद्य प्राशन करतात आणि मुलांना बर्फ आणि चुना आणायला सांगतात.कित्येक ठिकाणी वडील आणि मुलगा सोबतच चिअर्स करण्यासाठी एकत्र बसतात. यावेळी आम्ही कायदा मोडतो आहोत आणि सामाजिक संकेतही पायदळी तुडवतो आहोत याचे आम्हाला भान नसते.
हॉटेल, बियर बार, पब हे किती वेळ चालू ठेवावे यासाठी काही नियम आहेत. रात्री १२ नंतर हे चालू ठेवता येत नाहीत. मात्र हे नियम धाब्यावर बसवून आज देशातील सर्वच महानगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत असे बार आणि पब सुरू असतात. महामार्गांवर तर हे हमखास दिसते, आणि याला पायबंद घालावा अशी अपेक्षा ज्यांच्याकडून ठेवतो ते पोलीस याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.
हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर आपल्या देशात कायद्याचा काहीही धाक राहिलेला नाही हा निष्कर्ष निश्चित काढता येतो. कायदा काहीही असो, तुमच्या जवळचा पैसा, तुमची समाजातील प्रतिष्ठा, आणि सत्तेशी तुमचे असलेले संबंध यांच्या जोरावर तुम्ही कायदा केव्हाही आणि कसाही धाब्यावर बसवू शकता हे इथे स्पष्ट दिसते आहे. महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत आणि माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना एकदा नागपुरात एका मित्राने विचारले की नागपुरात तुमची प्रतिष्ठा किती आहे? ज्या काळात हा प्रश्न विचारला त्या काळात नागपुरात रात्रीच्या वेळी सायकलने फिरायचे असेल तर सायकलला दिवा किंवा टॉर्च लावून लावावा लागत असे. असा दिवा नसलेली सायकल घेऊन निघालात तर पोलीस तुम्हाला चालन करत असत. त्या काळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्माधिकारी म्हणाले होते की नागपुरात रात्रभर मी कुठेही सायकलला दिवा न लावता फिरलो तरी कोणताही पोलीस मला पकडणार नाही, आणि पकडले तरी त्याच्या वरच्या साहेबाला सांगून मी निर्दोष सुटेन. हा किस्सा सांगून धर्माधिकारी सांगायचे की आपल्या देशात कायदा पाळण्यापेक्षा तुम्ही कायदा किती मोडू शकता यावर तुमची प्रतिष्ठा ठरत असते हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. न्यायमूर्ती धर्माधिकारींनी अनेक भाषणांमध्ये हा किस्सा सांगितलेला आहे. खाजगी बैठकीतही बोलताना ते सांगायचे की आपण कायदा पाळायला आणि कायद्याचा सन्मान करायला कधी शिकायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे.पुण्यात मध्यरात्री घडलेला हा अपघात आणि त्या संदर्भात आलेल्या बातम्या आणि कानावर आलेल्या चर्चा हे सर्व लक्षात घेतले तर न्यायमूर्ती धर्माधिकारींच्या या व्यथेतून त्यांनी व्यक्त केलेली खंत आजही सुजाण नागरिकांना जाणवू शकते.हा देश जर खरोखरी जागतिक महासत्ता बनवायचा असेल तर इथे जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा कायद्याने वागणाराच असायला हवा. ही काळजी घेतली गेली पाहिजे. तसे झाले तरच आम्ही प्रगती करू शकू. अन्यथा हा देश जागतिक महासत्ता न बनता अराजकाकडे वाटचाल करेल हा धोका लक्षात घ्यायला हवा. पुण्यात झालेल्या अपघाताच्या घटनाक्रमातूनहाच बोध येऊ शकतो.