महाड : पहिली ते आठवीमध्ये शिकणारे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, याचबरोबर पटसंख्या वाढावी यासाठी, समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. त्यानुसार सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील मुले व खास करून मुलींमध्ये शाळा गळतीचे प्रमाण अधिक असते. पुस्तके नसल्याने अनेक मुले शाळेपासून दूर राहतात. शाळेतील पटसंख्या तसेच उपस्थिती वाढावी, याकरिता विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीत शिकवणाऱ्या एक लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) सरकारमार्फत मोफत पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत पोहोचती करण्यात येणार आहे. ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय, वर्गनिहाय, माध्यमनिहाय, पंचायत समितीनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
कोट
जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका शाळा आणि खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील.
– पुनिता गुरव, प्राथमिक विभाग, रायगड
