मुरूड :- साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला जंजिरा किल्ला कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गांपैकी एक असून वास्तूशिल्पाचा अजोड नमुना आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्यात किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. यंदा २६ मेपासून ही वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या सहायक संवर्धकांकडून देण्यात आली.
पावसाळ्यात खोरा जेटी अथवा राजपुरी जेटीवरून बाहेरून किल्ला पाहता येईल. मात्र समुद्रात जाण्यास बंदी असेल. पावसाळ्यात समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्याने पर्यटकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सरकारी स्तरावरून किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक बंद केली जाते. २६ मेपासून जंजिऱ्याचे दरवाजे बंद करावेत, असे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्त्व विभागाला देण्यात आले आहेत.
दरवर्षी सहा ते सात लाख पर्यटक ऐतिहासिक जंजिरा व अलीकडे पद्मदुर्ग किल्ल्यावर येतात. खोराबंदर व राजपुरी येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्थानिकांच्या १५ शिडाच्या होड्या व दोन इंजिन बोटी तैनात असून राजपुरीच्या १५० कुटुंबीयांची गुजराण या व्यवसायावर निर्भर आहे. फास्टफूड, शीतपेये, नारळपाणी आदींसह पर्यटनावर आधारित छोटे-मोठे व्यवसाय तीन महिने बंद राहत असल्याने स्थानिकांना पर्यायी रोजगार शोधावा लागतो.
