ठाणे : ठाण्यातील सखी मतदान केंद्र हे नववधूसारखे सजविण्यात आले होते. आकर्षक फुग्यांच्या कमानीने तर लाल, हिरवी मॅट अंथरली होती. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढले तसेच इतरांना मतदानासाठी समाजमाध्यमांवरून आवाहन केले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मतदान केंद्रावर ‘सुस्वागतम्’ असे लिहिलेल्या कमानी उभारल्या होत्या. महिलांसाठी बैठक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करत होत्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारली होती. त्यावर आम्ही ‘मी मतदान केलं तुम्ही केलं का?’, असे वाक्य ठळकपणे लिहिले गेले होते. सेल्फी काऊंटर फुग्यांनी सजविले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारीदेखील घेण्यात आली होती. तर काही केंद्रांवरील असुविधांबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ३३२ येथे युवा मतदार केंद्रात सेल्फी स्टॅन्ड उपलब्ध नव्हता. तर ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ४३९ या ठिकाणी मतदारांनी गर्दी केली आहे; मात्र पिण्यासाठी पाणी व पंख्याची सोय नसल्याने गर्मीने काही मतदार वैतागून मत न देता मागे फिरल्याचे चित्र दिसले.
गुलाबी वस्त्र परिधान
महिलांना निर्भय मतदान करता यावे, यासाठी सखी मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होते. सखी या केंद्रावरील कर्मचारी महिलांनी खास गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते.
