दिन विशेष
श्याम ठाणेदार
आज २१ मे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज ३३ वा स्मृतीदिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. आधुनिक विचार आणि कठोर निर्णयामुळे राजीव गांधी यांनी जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली. २० ऑगस्ट १९४४ रोजी जन्मलेले राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान बनले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांचे जेष्ठ सुपुत्र असलेले राजीव यांना राजकारणात रस नव्हता. देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकीय घराण्यात जन्म घेऊनही राजीव गांधी हे राजकारणापासून दूरच होते. राजीव गांधी यांचे शिक्षण डेहराडूनच्या शाळेत झाले त्यानंतर ते हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डुन च्या निवासी शाळेत दाखल झाले. तिथे त्यांना अनेक मित्र भेटले या मित्रांशी त्यांनी आयुष्यभर मैत्री जपली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते केम्ब्रिजच्या ट्रीनीटी महाविद्यालयात गेले पण लवकरच लंडन स्थित इम्पेरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान या विषयात खूप रस होता. ते या विषयाची पुस्तके वाचून काढत. विमान उड्डाण करून आकाशात उडावे अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी वैमानिक होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये त्यांनी फ्लायिंग क्लबची परीक्षा दिली आणि वैमानिक बनले. लगेचच ते इंडियन एअर लाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले. लंडनमध्येच त्यांची आणि सोनिया गांधी यांची मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १९६८ साली त्यांचा विवाह झाला. राजीव गांधी हे अपघातानेच राजकारणात आले. १९८० साली राजीव गांधी यांचे बंधू संजय गांधी यांचा अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी मागणी काँग्रेस मधील नेत्यांकडून होऊ लागली. आई इंदिरा गांधी यांनीही राजीव गांधी यांना राजकारणात उतरण्याची सूचना केली तेंव्हा राजीव यांनी आपल्या भावाच्या संजय गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघातुन निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने ती जिंकली. १९८२ साली दिल्लीत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेच्या नियोजनाची सर्व जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे होती त्यांनी ती यशस्वीरीत्या पेलून ही स्पर्धा यशस्वी केली. ३१ नोव्हेंबर १९८४ इंदिरा गांधी यांची हत्या झाली. हत्या झाली तेंव्हा इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला. पंतप्रधानपदासारखे देशातील सर्वोच्च पद जास्त दिवस रिक्त ठेवता येणार नाही असे घटना तज्ज्ञांचे मत होते त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. वैयक्तिक पातळीवर दुःख असूनही त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. त्यानंतर झलेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या निवडणुकीत काँग्रेसला ४०० हुन अधिक जागा मिळाल्या. स्वतः राजीव गांधी हे विक्रमी मतांनी जिंकून आले होते. पंतप्रधान असताना त्यांनी देशात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने प्रगती करायला हवी असे त्यांचे मत होते. २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे असेल त्यासाठी देशातील प्रत्येक तरुण हा संगणक साक्षर असायला हवा असा त्यांचा आग्रह होता त्यामुळेच त्यांनी देशात संगणक आणला. राजीव गांधी जेंव्हा संगणकावर बोलत होते तेंव्हा अनेकजण त्यांच्यावर टीका करत होते. पण संगणक क्रांती आणणार हा ध्यास त्यांनी घेतला होता. राजीव गांधींमुळेच सर्वसामान्य घरात संगणक पोहचला. राजीव गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ८ टक्के म्हणजे तेरा लक्ष कोटींचा माहिती तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला. यातून पन्नास लाख लोकांना थेट रोजगार मिळतो आहे. माहिती प्रधान सभ्यता, ज्ञान प्रधान सभ्यता, बुद्धिमत्ता प्रधान सभ्यता या तीन क्रांतीची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. त्याचीच फळे आज भारत देश चाखतो आहे. राजीव गांधी यांच्या दुरदृष्टीमुळे भारताचा वेगाने विकास झाला आणि लोकांचे जीवनमान उंचावले. स्वभावाने गंभीर पण आधुनिक विचाराच्या राजीव गांधी यांनी देशात माहिती तंत्रज्ञान युगाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळेच त्यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हणतात. राजीव गांधी यांनी दूरसंचार क्रांती बरोबरच नवे शैक्षणिक धोरण आणून देशभरात नवोदय विद्यालयाची स्थापना केली. त्यासोबतच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना राजकारणात मोठी संधी दिली. राजीवजींनी घेतलेले हे निर्णय भारताच्या जडणघडणीत आणि विकासात मैलाचा दगड ठरले आहेत. भारत देशाला राजीव गांधी यांनी तंत्र वैज्ञानिक दृष्टी दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती बनवून भारताला स्वाभिमान दिला. पुढच्या पन्नास वर्षाचा अर्थव्यवस्थेचा पाया राजीव गांधी यांनी त्यावेळेला रचला होता त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहचू शकलो. देशाला माहिती तंत्रज्ञानात परिपूर्ण करून महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या पंतप्रधानाचे २१ मे १९९१ रोजी लिट्टे या दहशतवादी संघटनेने मानवी बॉम्बचा वापर करून हत्या केली म्हणून आजचा दिवस देशभर दहशतवादी विरोधी दिवस म्हणूनही पाळण्यात येतो. राजीव गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!