मतदानासाठी भर उन्हात चार चार तासाचा खोळंबा

मुंबईत मतदानाचा टक्का वाढता वाढता राहीला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकशाहीचा उत्सव म्हणून गाजावाजा केलेल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाचा अक्षरशा खेळखंडोबा झाला. मुंबईतील सहा मतदारसंघासहीत ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील एकुण १३ लोकसभेच्या मतदार संघात मतदान होते. परंतु या शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदारांना बसला. लांबचलांब रांगा. संथगथीने होणारे मतदान, त्यात मोबाईल जवळ बाळगण्यास घालण्यात आलेली बंदी आणि उन्हाचा तडाका यामुळे अनेक नागरिक तासनतास मतदानाच्या लाईनीत उभे राहून शेवटी कंटाळून मतदान न करता घरी परतले. याचा फटका मुंबईतीली मतदानाच्या टक्क्यावरही बसला. सायंकाळी पाच वाजता  निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पाचव्या टप्प्यात एकुण ४८.६६ टक्के मतदान झाले. मतदानाच्या या खेळखंडोबामुळे टक्केवारी वाढता वाढता राहीली.

दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी याची दखल घेत मतदान प्रक्रीयेचा वेग वाढविण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली. आणि त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीचे पत्रकार परिषद घेत सरकारवर याचे खापर फोडले. शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या बुथवर नेमके मतदान संथ असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. इतकेच नव्हे तर पहाटेचे पाच वाजले तरी बेहत्तर मतदान केलाशिवाय मतदान केंद्र सोडू नका असे आवाहनही त्यांनी केले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम मध्ये हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली. एकूण आकडेवारी पाहता कल्याण लोकसभेमध्ये 80 हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं आढळून आले.

आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रात पोहोचले होते. त्यांचे वोटिंग कार्ड त्यांच्याजवल होते, पण मतदार यादी तपासली असता त्यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या. मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले.

शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले की, “कल्याण भिवंडी लोकसभेत लाखो नागरिकांची नावे कमी केली आहे. जवळपास 1 लाख नावे मतदार यादीतून वगळली आहेत. मतदार राजा बोलत आहे आमचा मतदानाचा अधिकार हिराहून घेतला आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी. काही दिवसांनी पुन्हा निवडणुका येणार आहेत. या यादीमध्ये डीलिटेड म्हणून शिक्के मारुन दिले आहेत. अनेक नावांमध्ये बदल झाले आहेत.”

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत मतदान केंद्रांना भेटी देत मतदारांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाच नंतर त्यांनी माहीम मतदार संघाला भेट देत तेथील मतदारांची विचारपूस केली. या पाहणीत त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे पोलिंग बूथवर सुविधा नसल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाला, मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सगळे मुंबईकर सकाळपासून मतदान करण्यासाठी बाहेर पडले. अनेक ठिकाणी ते उन्हात उभे होते. पंखेसुद्धा लावण्यात आले नव्हते. एक दोघांना चक्कर सुद्धा आली. पाण्याची सोय नाही. सावलीत कुठे रांगा उभ्या केल्या नाहीत”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

सर्वाधिक कमी मतदान कल्याणमध्ये

कल्याण लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील सगळ्यात कमी मतदान नोंदविले गेले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 41.70 टक्के मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात अंदाजे 45.38 टक्के मतदान झालं. तर भिवंडीत अंदाजे सरासरी 48.89 टक्के मतदान झालं आहे.

सायंकाळी पाचवाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

उत्तर मुंबई – 46.91 टक्के 
उत्तर मध्य मुंबई –  47.32 टक्के 
उत्तर पूर्व मुंबई –  48.67 टक्के 
उत्तर पश्चिम मुंबई –  49.79 टक्के 
दक्षिण मुंबई – 44.22 टक्के 
दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के 

ठाणे –  45.38 टक्के 

कल्याण –  41.70 टक्के 
पालघर –  54.32 टक्के 
भिवंडी  48.89 टक्के 
धुळे -48.81 टक्के 
दिंडोरी –  57.06 टक्के 
नाशिक – 51.16 टक्के 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *