कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे दर्शन घडवण्यात आले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांनी विविध मतदान केंद्रे तयार केली.
मतदानाचा टक्का वाढावा, तसेच मतदारांना आकर्षित केले जाईल, अशी मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्याची संस्कृती, परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला. डहाणूतील मल्याण मतदान केंद्रात वारली चित्र रेखाटन, चिखला येथील शाळेतील मतदान केंद्रात कोळी मतदान केंद्र, गटसदन केंद्र डहाणू येथे युवा व्यवस्थापित केंद्र, मॉडल हायस्कूल मसोली येथे आदिवासी पारंपरिक मतदान केंद्र, तर वाकी ब्राह्मण पाडा येथे सक्षम मतदान केंद्र, नंदारे येथे सखी मतदान केंद्र उभारले होते. यामुळे येथील संस्कृती, परंपरा जपल्या जातील आणि मतदारांना आकर्षित करून मतदानाचा टक्कादेखील वाढला जाईल, यासाठी ही मतदान केंद्रे उभारली आहेत.