वसई : लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. दुपारी १ वाजेपर्यंत वसईत ३१ टक्के तर नालासोपाऱ्यात २० टक्के मतदान झाले. संध्याकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवार असल्याने अनेक खासगी कामगारांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली असल्याने सकाळपासूनच कामगार वर्गाची गर्दी केंद्रावर दिसून येत होती, तर दुसरीकडे वातावरणातील उकड्यामुळे अनेक नागरिकांनी सकाळीच मतदानाला जाणे पसंत केले. सकाळी नऊ वाजेपर्यंत जेमतेम आठ टक्के मतदान झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र नंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावल्याने दुपारी १ वाजेपर्यंत वसईत ३१ टक्के तर नालासोपाऱ्यात २० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये नव्याने प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांत मोठा उत्साह दिसून आला. परंतु नालासोपारा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याने मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांचा हिरमोड झाला आहे.
केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती. दिव्यांग मतदार यांची ने आण करण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
आमदार हितेंद्र ठाकूर व उमेदवार राजेश पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेश पाटील यांनी पत्नीसह विरार पूर्वेच्या भाताणे येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला तर आमदार हितेंद्र ठाकूर यांनीसुद्धा परिवारातील सदस्यांसह विरार येथे मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान केंद्रावरील असुविधा याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
विविध राजकीय पक्षाचे बूथ
निवडणुकीच्या दिवशी गावागावात विविध राजकीय पक्षांनी बूथ उभारले होते. तसेच मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली होती. तर बूथवरती चहा नाष्टा याची व्यवस्था करण्यात आली होती.