भारतीय जनता पक्ष आता पूर्णतः सक्षम झाला असून स्वबळावर तो संपूर्ण कारभार चालवू शकतो. अशावेळी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधार घेण्याची काहीही गरज नाही, अशा आशयाचे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या विधानाने सहाजिकच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना विशेष गुदगुल्या झालेल्या आहेत. हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विविध विधानांवरून दिसून येते. हे विधान करताच एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलते झाले. त्यांचा जुनाच आरोप आहे की भाजप आपल्या स्वार्थासाठी लोकांना सोबत घेतो आणि आपला फायदा करून घेतो. काम झालं की ज्याला सोबत घेतले त्यालाच लाथ मारून हाकळून देतो. याच आरोपाची टेप पुन्हा वाजवत उद्धव ठाकरेंनी भाकीत केले की आता भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लाथ मारून हाकलून देणार. त्यांनी त्यापुढे जाऊनही असे भाकीत केले की यावेळी मोदींना ४०० च्या वर जागा मिळाल्या, तर ते संघावर बंदी घालायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. परिणामी संघाच्या शताब्दी वर्षातच संघाला पुन्हा एकदा बंदीला सामोरे जावे लागेल असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा काहीही संबंध नाही ते कधी संघाच्या शाखेत किंवा एखाद्या वेळी संघाच्या बैठकीत तरी गेले असतील का? हा प्रश्नच आहे. तरीही ते बेधडक विधान करून मोकळे झाले. कारण ते राजकीय नेते आहेत. आणि राजकीय सोयीसाठी त्यांनी कोणतेही विधान केले तरी चालते. मात्र वास्तव काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात बित्तमबातमीने खोलात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता जेपी नड्डा यांनी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अशा आशयाचे विधान केले होते असे लक्षात आले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार नड्डाजींचे हे विधान काहीसे वेगळे असताना विपर्यस्त स्वरूपात ते मांडले गेले आहे, आणि त्या विधानावर गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. ही शक्यता देखील नाकारता येत नाही. असे असले तरी संघाची आता भाजपाला गरज नाही असे मत जे पी नड्डा यांनी व्यक्त केले हे वास्तव तर नाकारता येत नाही. त्यामुळे या संदर्भातल्या काही नेमक्या बाबी वाचकांसमोर आणणे गरजेचे आहे ठरते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही १९२५ साली राष्ट्रीय विचाराने भारलेल्या मंडळींनी एकत्र स्थापन केलेली एक गैरराजकीय संघटना आहे. ज्या काळात ही संघटना उभी झाली त्यावेळी देशात हिंदूंचे असे कोणतेही संघटन नव्हते. त्यामुळे हिंदूंचे संघटन व्हावे आणि हिंदूंच्या रक्षणार्थ हिंदूंनीच सक्रिय व्हावे या भावनेतून ही संघटना त्यावेळी उभी झाली होती. नंतरच्या काळात राष्ट्रीय भावनेतून या संघटनेने काम सुरू केले.
संघ स्थापनेपासून जरी राजकीय क्षेत्रातून दूर राहिलेला असला तरी हळूहळू समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये सक्रिय होऊ बघत होता. त्यामुळे मजूर क्षेत्र, विद्यार्थी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, अशा विविध क्षेत्रांमध्ये संघाने काम सुरू केले. अर्थात हे काम सुरू करताना संघाने त्या त्या क्षेत्रात काम करण्यासाठी फक्त कार्यकर्ते दिले. या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात संघटना उभारल्या आणि काम वाढवायला सुरुवात केली. या संघटना स्थापन करताना संघाने दिशादर्शन जरूर केले. मात्र संघटनांच्या दैनंदिन कामकाजात कोणतेही लक्ष संघाने घातले नाही. कधीही कोणताही हस्तक्षेप केला नाही. याच काळात राजकीय क्षेत्रातही संघ विचारांच्या मंडळींच्या पक्षाची गरज वाटू लागली. त्यामुळे संघ विचारांचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयालजी उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, अशी मंडळी समोर आली आणि त्यांनी १९५२ साली भारतीय जनसंघाची स्थापना केली. या संघटनेत संघ विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. मात्र इथेही संघाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता.
भारतीय जनसंघाचे काम हळूहळू वाढू लागले. दरम्यानच्या काळात देशाच्या राजकीय क्षितिजावर बरीच उलथापालन झाली. परिणामी देशात आणीबाणी लागली. त्याचे पर्याय विरोधी पक्षांचे एकत्रीकरण होऊन जनता पक्षाची स्थापना होण्यात झाले. भारतीय जनसंघ हा देखील जनता पक्षात सहभागी झाला.
मात्र पुढे जाऊन जनता पक्षातील समाजवादी मंडळींनी आक्षेप घेतला की जुने जनसंघी हे एकीकडे जनता पक्षाचे सदस्य आहेत तर दुसरीकडे ते संघाचेही सदस्य आहेत. त्यामुळे हे दुहेरी सदस्यत्व चालणार नाही असा त्यांचा आक्षेप होता. त्यावर बरेच वाद झाले. याच काळात जनता पक्षाची सत्ता गेली.शेवटी एप्रिल १९८० मध्ये जनता पक्षातून जुन्या जनसंघाचे लोक वेगळे झाले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यावेळी संघाचे सदस्यत्व मानणारेच सगळे जनता पक्षातून भाजपमध्ये आले होते.
हळूहळू भाजप वाढू लागला आणि काळाच्या प्रवाहात जनता पक्ष आज नामशेष झालेला आहे. त्याच वेळी भारतीय जनता पक्ष हा आज देशातला प्रमुख सत्ताधारी पक्ष बनलेला आहे. केंद्रात स्पष्ट बहुमतासह भाजपची सत्ता आहे, तर देशातील अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे.
भाजपच्या या वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही हातभार लागलेला आहे असा दावा केला जातो. इथे मात्र काही अभ्यासकांचे वेगळे मत दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजाच्या सर्वच क्षेत्रात आपला विचार पोहोचवण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये विविध संघटना स्थापन करण्यासाठी आपल्या स्वयंसेवकांना उत्तेजन जरूर दिले. मात्र संघटना स्थापन झाल्यावर त्यामध्ये संघाने कधीच हस्तक्षेप केला नाही असे सांगण्यात येते. या सर्व संघटनांना गरज लागेल तिथे संघ मार्गदर्शन जरूर करतो. मात्र त्या मार्गदर्शनानुसारच काम झाले पाहिजे असा संघाचा कधीही आग्रह नसतो. या सर्व संघटनांचे प्रतिनिधी संघ श्रेष्ठींशी वेळोवेळी चर्चा जरूर करतात. मात्र याचा अर्थ संघच या संघटना चालवतो असा कधीच होत नाही. हाच प्रकार भारतीय जनता पक्षाच्या बाबतीतही आहे. १९७७ मध्ये जनसंघाला जनता पक्षात विलीन करून घेणारे जुने संघ स्वयंसेवक दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण केला गेला त्यावेळी होय आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत असे छातीठोकपणे सांगत जनता पक्षातून वेगळे झाले, आणि आपला पक्ष त्यांनी वाढवला. या वाटचालीत पक्ष वाढवण्यासाठी संघाने काय मदत केली असेल तर संघ विचाराचे कार्यकर्ते या पक्षात आले, आणि ज्याप्रमाणे ते संघात झोकून देत काम करतात त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय जनता पक्षातही झोकून देत काम केले. अशी कोणतीही अपेक्षा न ठेवता झोकून देत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पक्ष दोन खासदारांपासून ३०३ खासदारांपर्यंत पोहोचू शकला, आणि आज ४०० च्या वर जाण्याची च्या हिम्मत दाखवतो आहे. या वाटचालीत जे संघ स्वयंसेवक भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले, त्यांना संघाने कधीही भाजपमध्ये सक्रिय व्हा असा आदेश दिला नव्हता. स्वेच्छेने ते भाजपमध्ये सक्रिय झालेले आहेत. आज त्यांनी आपला जनसंपर्क वाढवत समाजातील इतर नागरिकांनाही भाजपसोबत आणले आहे. आणि त्यायोगे संघ विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. आज केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार गत दहा वर्षांपासून आहे. मात्र या दहा वर्षात संघाने सरकारचा फारसा फायदा कधी घेतल्याचे कुठेही दिसून आलेले नाही. आजही भाजपच्या कोणत्याही निर्णयात संघाने कधी कोणता हस्तक्षेप केल्याचेही कानावर आलेले नाही. निरपेक्ष भावनेने संघ आपले काम करीत आहे. संघाचे काम चारित्र्यसंपन्न कार्यकर्ते निर्माण करणे आणि ते समाजाच्या विभिन्न क्षेत्रात कार्यरत करणे इतकेच आहे. त्या हेतूनेच संघाने गेली ९९ वर्ष कार्यकर्ते घडवण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यातीलच काही कार्यकर्ते संघाने भाजपला दिले आणि भाजप सक्षम केला. आज इंडियन एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार जे.पी. नड्डा हे भाजपला आता संघाची गरज नाही असे म्हणतात. संघ वर्तुळात डोकावले असता सामान्य संघ स्वयंसेवकाला त्यांच्या या विधानाचे काहीही सोयर सुतक नाही. संघ वर्तुळातील ज्येष्ठांच्या मते आज अजूनही समाजाच्या विभिन्न क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय विचारांनी भरलेल्या कार्यकर्त्यांची खूप गरज आहे. जर भाजपला अजूनही कार्यकर्ते हवे असतील, तर संघ त्यांना देईलही. जर भाजपाला नव्या कार्यकर्त्यांची गरज नसेल, तर संघाला इतर क्षेत्रांमध्ये जिथे गरज आहे तिथे कार्यकर्ते देता येतीलच. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आता गरज संपल्यावर संघालाही फेकून देतो आहे, या आरोपात फारसे तथ्य वाटत नाही. संघाला तर त्याचे काही वाटत असेल असे काहीही चिन्ह दिसत नाही. संघ निरपेक्ष भावनेतून व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेऊन काम करत राहणार आहे. तेच संघाचे ध्येय आहे. इतरांनी कितीही ओरड केली, तरी संघावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे चित्र आज संघ वर्तुळात कानोसा घेतल्यावर दिसून येते.