अलिबाग– आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४९९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पनवेल महानगर पालिका आणि सर्व नगरपालिकांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले. या शहरांमध्ये प्राथमिक पहाणीत ४९९ इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले. यात पनवेल येथे सर्वाधिक २१५ ,कर्जत येथे १५४, उरण ६४, महाड ११, श्रीवर्धन ११, अलिबाग ९, रोहा ८, पेण ८, मुरुड ४, माथेरान ६, खालापूर ३, म्हसळा ९ धोकादायक इमारतींचा समावेश आहे.