पर्यावरण

मिलिंद बेंडाळे

सर्व प्रकारच्या प्रदुषणाबरोबरच वाढते वायू प्रदूषण ही गंभीर समस्या असून मातेच्या गर्भात असताना वा पहिल्या दोन वर्षांमध्ये मुले प्रदुषित हवेच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मेंदूची रचना बदलत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. लहान वयात झालेल्या प्रदुषणाचा परिणाम मुलांना पौंगडावस्था वा प्रौढ वयात भोगावा लागतो. म्हणूनच शरीराबरोबर मनावर परिणाम करणारा हा धोका वेळीच ओळखायला हवा.

अन्य प्रदुषणांप्रमाणेच वाढते वायू प्रदूषण हा अलिकडच्या काळातील गंभीर प्रश्न आहे. हे प्रदूषण वाढण्यास नानाविध बाबी कारणीभूत ठरत असून त्यांचे दुष्परिणाम काही अंशी दूर ठेवण्यासाठी बर्‍याच शहरांमध्ये आवश्यक तेव्हा शाळांना सुट्ट्या देणे, एका वेळी ठराविक क्रमांकाच्या गाड्याच रस्त्यावर आणणे, इंधनाचा अतिवापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे हे आणि यासारखे उपाय योजले जाताना दिसतात. मात्र असे असले तरी त्यापासून संपूर्ण सुटका होतेच असे नाही. काळजीचे कारण म्हणजे या प्रदुषणामुळे मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचेही आता समोर आले आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काळजी वाढवणारा आहे. अलिकडेच या संदर्भात करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात दिसून आले आहे की, आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या संपर्कात आल्याने मुलांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. हा अभ्यास ‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’शी संबंधित संशोधकांनी केला आहे. त्याचे परिणाम ‘जर्नल एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल’मध्ये अलिकडेच प्रकाशित झाले. या संशोधनानुसार, प्रदूषित हवेत श्वास घेतल्यामुळे गभार्र्तील भ्रुणांना तसेच लहानग्यांना बालपणीच्या काळात मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या महत्त्वपूर्ण अभ्यासानुसार, पहिल्या दोन वर्षांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या संपर्कात आलेल्या मुलांना नंतर चार ते आठ वर्षांच्या दरम्यान काही समस्या भेडसावू शकतात. जसे की, त्यांना कोणत्याही गोष्टीवर लक्ष देण्यास वा ध्यान केंद्रित करण्यास त्रास होऊ शकतो. हे परिणाम मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करतात.
नायट्रोजन डायऑक्साइड हा प्रदूषणवाढीस कारक ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कार आणि ट्रकमधून बाहेर पडणार्‍या घातक घटकांमुळे होणारे हे प्रदूषण वेगाने पसरते. संशोधनात असेही समोर आले आहे की या घातक वायूच्या संपर्कात राहणारी चार ते सहा वर्षे वयोगटातील मुले स्मरणशक्तीबाबतही आपल्या वयोगटातील अन्य मुलांच्या तुलनेत मागे राहतात. संशोधकांना वयाच्या सहा ते आठ वर्षांपर्यंत प्रामुख्याने हा परिणाम दिसून आला. तथापि, आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये त्याचा प्रभाव खूपच जास्त असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हा अभ्यास स्पेनमधील चार प्रदेशांमधील १,७०३ महिला आणि त्यांच्या मुलांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. त्यांची माहिती ‘आयएनएमए’ प्रकल्पाद्वारे संकलित करण्यात आली. संशोधकांनी गर्भधारणेदरम्यान आणि आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांमध्ये या मुलांना किती नायट्रोजन डायऑक्साइडचा सामना करावा लागला, याची माहिती गोळा केली. यासोबतच संशोधकांनी संगणकीकृत चाचण्यांच्या मदतीने चार ते सहा आणि सहा ते आठ वयोगटातील मुलांमध्ये लक्ष देण्याची क्षमता तपासली. या तपासणीमध्ये मुलांमध्ये कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या नाही, हे निवडण्याची क्षमता किती परिपक्व आहे याचाही विचार केला गेला. त्याचप्रमाणे सहा ते आठ वर्षे या काळात मुलांना मेंदूत ठराविक माहिती किती काळ टिकवून ठेवणे शक्य होते हे शोधण्यासाठीही संशोधकांनी ‘लक्ष कालावधी’ची चाचणी केली.
एका नवीन अभ्यासात असेही दिसून आले आहे की १.३ ते १.५ वर्षे वयोगटातील उच्च पातळीच्या नायट्रोजन डायऑक्साइडच्या संपर्कात असणार्‍या चार ते सहा वर्षे वयाच्या मुलांनी लक्ष चाचणीदरम्यान जास्त वेळ घेतला होता तर १.५ ते २.२ वर्षे वयोगटातील नायट्रोजन ऑक्साइडच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्याने या चाचण्यांमध्ये त्यांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत अधिक त्रुटी आढळल्या. त्यांच्यात लक्षात राहण्याचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे ०.३ ते २.२ वर्षे वयोगटातील नायट्रोजन ऑक्साइडच्या संपर्कात आलेली मुले सहा ते आठ वर्षांच्या वयात होती, तेव्हा त्यांचे प्रतिसाद देण्याचे प्रमाण सातत्याने कमी कमी होत होते. तथापि, नायट्रोजन डाय ऑक्साईडच्या गंभीर पातळीच्या संपर्कात आलेल्या सहा ते आठ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये मात्र कोणताही अडथळा वा त्रुटी आढळून आली नाही. अभ्यास संशोधक अ‍ॅन-क्लेअर बिंटर यांनी म्हटले आहे की वाहतुकीशी संबंधित प्रदूषण वाढल्याने मुलांचा लक्ष वेधण्याचा विकास कसा मंदावतो हे संबंधित निष्कर्ष दर्शवतात. आपल्या मेंदूच्या सर्व महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष सुनिश्चित असणे अत्यंत आवश्यक आहे यात शंका नाही. या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्रिया, विचार आणि भावनांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण यांचा समावेश होतो.
‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’ आणि अभ्यास संशोधक अ‍ॅन-क्लेअर बिंटर यांनी म्हटले आहे की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा एक महत्त्वाचा भाग असून तो ही सगळी कार्ये पूर्ण करतो. मात्र त्याचाच विकास खूप हळू होतो आणि गर्भात असताना तसेच आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातही अपरिपक्व होत राहतो. वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्यास ही मुले अत्यंत संवेदनशील होतात. खेरीज अंगावर सूज येणे आणि आपल्यातील ऊर्जेचा वापर करणेही त्यांना जमत नाही. दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याच्या मुलांच्या क्षमतेवर प्रदूषित हवेचा परिणाम का होतो, याबाबत संशोधकांनी अधिक सविस्तर माहितीही दिली आहे. त्याबाबत अधिक स्पष्टतेने सांगताना ते म्हणतात की, अशा मुलांचा मेंदू अत्यंत कमी वेगाने परिपक्व होतो. त्यामुळेच ती स्वत:ला अधिक असुरक्षित समजू शकतात. अर्थात त्यांची ही मनोवस्था अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुढील अभ्यासाची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. संशोधकांनी शिफारस केली आहे की भविष्यातील अभ्यासानुसार वायू प्रदूषण आणि ध्यान वा लक्ष केंद्रित करण्याची क्षमता यांच्यातील संबंधांवर वय आणि लिंग यांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी भविष्यात आणखी अभ्यास करावा लागेल. अर्थात वाढत्या प्रदूषणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम दिसून आल्याची वा असे निष्कर्ष समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, ‘पीएलओएस वन जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासातही समोर वाहनांमुळे होणारे प्रदूषण मुलांच्या मेंदूच्या संरचनेतही बदल घडवून आणत असल्याचे दिसून आले होते.
मेंदूच्या बाह्य स्तराला ‘ग्रे मॅटर’ म्हणतात. स्मरणशक्ती, एकाग्रता, जागरूकता, विचार, भाषा आणि चेतना यामध्ये हा स्तर महत्त्वाची भूमिका बजावतो. हा भाग मुलांच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, त्याची जाडी कमी झाल्यामुळे मुलांच्या विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर दूरगामी परिणाम होतो. आज भारतातील शंभर टक्के लोकसंख्या प्रदुषणाच्या विळख्यात आहे. त्याचप्रमाणे, नानजिंग विद्यापीठाशी संबंधित शास्त्रज्ञांनी केलेल्या आणखी एका अभ्यासात दिसून आले आहे की वायू प्रदूषणामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होते. त्यामुळे एखादी व्यक्ती दुसर्‍या दिशेने सहज भटकते. अभ्यासापासून ड्रायव्हिंगपर्यंत अनेक कामे आहेत, ज्यासाठी आपल्याला एकाग्रतेची गरज आहे. प्रदूषित हवेच्या श्वासोच्छवासामुळे विचार करण्यात आणि समजण्यात समस्या निर्माण होतात, असेही मागील संशोधनात दिसून आले आहे. यासोबतच वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या वागण्यावर तसेच काम करण्याच्या पद्धतीवरही परिणाम होत आहे. वायू प्रदूषण आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहे. त्यामुळे एकाग्रतेमध्ये समस्या निर्माण होत आहेत. जागतिक पातळीवर पाहिले तर वायू प्रदूषण ही आज मोठी समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरूनही याची पुष्टी होते. आज जगातील ९९ टक्के लोकसंख्येला प्रदुषित हवेत श्वास घेण्याशिवाय गत्यंतर नाही. येथे वायू प्रदुषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानकांपेक्षा खूप जास्त आहे. भारतासारख्या देशात तर या समस्येने अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे.
आज देशातील प्रत्येक व्यक्ती अशा घातक हवेत श्वास घेत आहे, जी त्याच्या आरोग्यासाठी सुरक्षित म्हणता येणार नाही. म्हणूनच लोकांच्या शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. एवढेच नाही, तर या प्रदुषणाचा जीवनमानावरही परिणाम होत आहे. अशा स्थितीत हा अभ्यास स्पेनमधील मुलांवर करण्यात आला असला, तरी भारतासारख्या देशातील मुलांच्या मानसिक आरोग्यावर वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. म्हणूनच याकडे तातडीने लक्ष देऊन देशातील वाढत्या प्रदूषणाची समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. हे शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *