भाजपा आमदार दरेकरांचा आरोप
मुंबई : मुलगा अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट गजानन किर्तीकरांचा होता असा मोठा दावा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
त्यातच भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही आरोप केल्याने गजानन किर्तीकरांच्या अडणचणीत वाढ झाली आहे.
शिशिर शिंदे यांची भूमिका अतिशय योग्य आहे. अस्तनीतले निखारे बाळगून पक्षाला तिथे त्रास होतो. विरोधक विरोधी भूमिका घेऊ शकतो. परंतु आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका घेणे हे अडचणीचे आणि घातपाताचं ठरू शकते. असे प्रविण दरेकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची आणि समोर अमोल किर्तीकरांना उभे करायचे. त्यानंतर जेव्हा उमेदवारी मागे घेण्याची वेळ होती तेव्हा स्वत:ची उमेदवारी मागे घेऊन मुलाला बिनविरोध निवडून आणायचे असा त्यांचा कट होता हा माझा स्पष्ट आरोप असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. वरिष्ठ नेते असल्याने त्यांना चांगली वागणूक दिली. परंतु गजानन किर्तीकरांचा उद्देश हा संशयास्पद होता. त्यातून आता हळूहळू ते सगळं बाहेर येताना दिसत आहे असंही भाजपा नेते प्रविण दरेकरांनी म्हटलं.
