अंबा बागायतदारांना फटका, लाखोंचं नुकसान
मुंबई : कोकणाला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा अंबा बागायतदार तसेच जांभुळ पिकालाही जबर फटका बसला असून लाखोंचं नुकसान झाले आहे.
अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातल्या ग्रामीण भागात जनजीवनावर काहीसा परिणाम झालेला दिसून येत आहे. विशेषतः बागायती शेतीला याचा फटका बसला आहे. दरम्यान अंदमानत दाखल झालेला मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये अरबी समुद्रात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तळकोकणात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभवाडीत मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. मान्सून पूर्व पावासामुळे शेतकऱ्यांची काम खोळबली आहेत.
आठ दिवसांपासून कोकणात मान्सून पूर्व पाऊस –
सिंधुदुर्गात गेले आठ दिवस सतत मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. यामुळे जिल्यातील आंबा आणि जाभूळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुळात यावर्षी जाभूळ पीक अत्यल्प प्रमाणात आलं होतं. त्यात मान्सून पूर्व पावसाने जांभूळ पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्तता निर्माण झाली आहे. कोकणातील सर्वात मोठ्या जांभूळ बाजारपेठेत जांभूळ नावालाही दिसत नाही.
चिपळूणमधील ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. सावर्डे आणि सह्याद्री भागात पावसाचा जोर जास्त आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आंबा बागायतदाराचे मोठं नुकसान झालेय. चिपळूणमध्ये अनेक भागात वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झालाय. मागील पाच दिवसात झालेल्या पावसात वादळ आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या पडझडीत 30 लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी. हवेत गारवा पण आंबा बागायतदार चितेंत आहेत.
सातऱ्यात वादळी पाऊस, घरांचं नुकसान
कोयना परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटणमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यामुळे पाटण आरल गावांमधील आठ घरांचे पत्रे उडाले आहे. त्याशिवाय शेतीचेही मोठं नुकसान झालेय. पाच दिवसापासून पाटणमध्ये सायंकाळच्या वेळेस वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी स्थानिकांनी केली आहे.
