आदिवासी वस्त्यांची पाण्यासाठी पायपीट

खोपोलीः आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने खालापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाकडून पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी ते तोकडे पडत आहेत.

सध्या खालापूरमध्ये काही वाड्या व सहा-सात दुर्गम गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर आणखी आठ गावांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्‍ताव आहे. २० हून अधिक वाड्या व गावांमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहिरींसह अन्य उपाययोजनांवर भर दिला जात असला तरी नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.

तापमानाचा पारा वाढल्‍याने विहिरी कोरड्या पडल्या असून धरणांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या आहेत. अनेक वाड्यात सद्यःस्थितीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्‍ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे.

तालुक्यातील परखंदे वाडी, शिरवली, डोणवत ठाकूरवाडी, वावोशी बौद्धवाडा, दांडवाडी, गोहे, बीड खुर्द, नडोदे, खरीवली, नारंगी, देवकुंड, शिरवली-ढेबेवाडी, चिंचवली-गोहे, बोरगाव-तारवाडी, वरोसे आंबेवाडी या ठिकाणी दरवर्षी पाणीटंचाई भेडसावते. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, त्‍यांची वणवण थांबावी यासाठी तालुका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ही गावे व वाड्यांमध्ये अनेक इंधन विहिरी व पाणी साठवणूक टाक्या पूर्णत्वास आल्या आहेत, तर काही प्रकल्प प्रस्तावित असून दीर्घकालीन उपाययोजनांमुळे या ठिकाणीचा पाणी प्रश्‍न निकाली निघेल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.

योजनांच्या रखडपट्टीवर मौन

खालापूर तालुक्यात तीन मोठी धरणे, अनेक पाझर तलाव व बारा महिने वाहणारी पाताळगंगा नदी आहे. असे असले तरी खालापुरकरांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र योजना का रखडलेल्या या बाबत बोलण्यास कोणीही तयार नाही.

खालापूर तालुक्यातून पाताळगंगा नदी वाहते. मोर्बा, कलोते, डोणवत या धरणांबरोबरच आत्करगाव, नढाळ यांच्यासह अनेक पाझर तलाव आहेत. असे असताना अनेक गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन् मैलाची पायपीट करावी लागते. प्रशासनाने सर्वच ठिकाणी पाणी योजना राबवल्‍या असल्‍या तरी निम्म्‍याहून अधिक योजनांची कामे रखडली आहेत. बारा महिने वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या योजना पूर्ण होऊ शकतात. मात्र नदीतील वाढते प्रदूषण, प्रशासनाची उदासीनतेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्‍याचे नागरिकांची तक्रार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *