मुंबई : घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घाटकोपर दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता.

एसआयटीच्या पथकामध्ये एकूण ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-७ चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे पथकाचे नेतृत्व करणार आहेत तर, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.

घाटकोपर जाहिरात फलकाचे व्यवस्थापन करण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये लागत असल्याचे सांगण्यात येत असल्याने भिंडेच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जात आहे. परवानगी कोणी दिली? प्रमाणपत्रे कोणी दिली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आतापर्यंत भिंडे याच्या मुलुंड येथील कार्यालयातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून अन्य जणांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. भिंडेच्या बँक खात्याचा लेखाजोखा, ‘इगो प्रायव्हेट लिमिटेड’सह त्याच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहाराची अधिक माहिती घेण्यात येत आहे. ‘एसआयटी’कडून बँकांसोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे. हे पथक मंगळवारी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) येथे गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *