केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव पोलिसांचाही खडा पहारा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. ही इव्हीएम यंत्रणा सुरक्षिततेसाठी स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येत असतात. त्यानुसार ठाण्यातील कावेसर येथील न्यू होरायझन शाळेत तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये या इलेक्ट्रॉनिक इव्हीएम मशिन्स ठेवल्या असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय निमलष्करी दल, राज्य राखीव पोलिस यांच्यासह स्थानिक पोलिस असे १२८ पोलीस कर्मचारी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

त्याचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीनसाठीही घोडबंदर रोडवरील कावेसर येथील आनंदनगर येथील न्यू होरायझन शाळेत स्ट्राँगरूम तयार केला आहे. या ठिकाणी ठेवलेल्या इव्हीएम मशीन सुरक्षित रहाण्यासाठी तीन स्तरावर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहिला थर केंद्रीय निमलष्करी दलांचा असून यामध्ये एक अधिकारी आणि २४ अमलदारांचा यात समावेश आहे. दुसरा स्तर राज्य राखीव पोलिसांचा असून त्यामध्येही एक अधिकारी आणि २४ अमलदार तैनात ठेवले आहेत. तिसऱ्या स्तरावर स्थानिक म्हणजे ठाणे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक ६६ पोलीस अमलदार यांचा फौजफाटा आहे. संपूर्ण स्ट्राँगरूम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *