नवी मुंबई ः रात्रभर सुरू असलेल्या पब, बार आणि रेस्टॉरंटमुळे नवी मुंबईतील तरुणाई धोक्यात आली आहे. सीमाशुल्क उत्पादन विभागाने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत बार खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचा गैरफायदा घेत वाशी, सानपाडा, नेरूळ आणि सीबीडी-बेलापूर या ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्लर आणि पबमध्ये महाविद्यालयीन मुले-मुली समुहाने जातात. परवानगी नसतानाही मद्यप्राशन करून रात्रभर पामबीच मार्गावर भरधाव वाहने चालवतात. त्यामुळे पुण्याप्रमाणेच शहरातील अपघाताची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी रात्रभर सुरू असलेल्या पब, बारच्या वेळांवर नियंत्रण आणण्याची ओरड पालकवर्गातून होत आहे.
पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कारने दोन आयटी इंजिनिअरला चिरडल्याच्या दुर्घटनेने देशभरात संताप व्यक्त होत आहे. अशा मुलांच्या पालकांवर जनसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतही मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, पॉलिटेक्निक कॉलेज आणि महाविद्यालये आहेत. या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रायगड, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी भागातून अल्पवयीन विद्यार्थी येतात. अनेक विद्यार्थी महाविद्यालयाजवळ असलेल्या हॉस्टेल आणि पेईंग गेस्ट म्हणून राहतात. अशा विद्यार्थ्यांवर पालकांचा अंकुश नसतो. मित्रांच्या संगतीने रात्रभर सुरू असलेल्या बार आणि पबमध्ये मौजमजा करण्याच्या नावाखाली मद्य प्यायले जाते.
वाशी, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स, सीबीडी-बेलापूर या भागांत मोठ्या प्रमाणात पब, बार, आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. याठिकाणी १७ वर्षाखालील तरुण-तरुणींना मद्य विक्री आणि पिण्यास कायद्याने बंदी आहे. तरी सुद्धा मद्याच्या दुकानात आणि पबमध्ये लाखो रुपयांची दारू या मुलांना विकली जाते. प्यायला दिली जाते. त्यामुळेच पुढे-मागे अशा प्रकारचे अपघात नवी मुंबईत घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बार आणि पबची वेळ कमी करून अल्पवयीन मुलांना दारू विक्री करण्यास बंदी घालण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
