वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. २०) उत्साहात पार पडले. जिल्ह्यात उष्णतेचा पारा अधिक असला, तरी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागातदेखील नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. यात महिलांची गर्दीदेखील लक्षणीय होती. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीची टक्केवारी पाहता मतदानामध्ये अपूर्णाकाने वाढ झाली आहे. पालघरची निवडणूक तिहेरी रंगणार, असे राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालघरचा गड राखणारा लोकप्रिय उमेदवार कोण, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता मतमोजणीवेळीच समोर येणार आहे.

पालघर मतदारसंघामध्ये एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. महायुतीचे डॉ. हेमंत सवरा, महाविकास आघाडीच्या भारती कामडी, तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आपल्याच पक्षाचा अथवा मित्रपक्षाचा उमेदवार निवडून यावा, म्हणून देशपातळीसह राज्यातील नेतेमंडळींनी पालघरचा दौरा केला. केवळ बहुजन विकास आघाडीची बाहेरून कोणताही स्टार प्रचारक मैदानात नव्हता, तर पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी ग्रामीण भागात प्रचाराची धुरा स्वतः सांभाळली होती. प्रमुख पक्षांनी या वेळी अधिक प्रचार राज्य आणि देशपातळीवरील मुद्द्यांवर भर देणारा केला होता. प्रचारात स्थानिक मुद्दे कमी प्रमाणात होते. प्रचार, जाहीर सभेतून शाब्दिक वार करण्यात आले. प्रचार सुरू असताना कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली होती; मात्र नेमके मतदारांचे झुकते माप कोणाकडे हे मात्र प्रचारात स्पष्ट झाले नाही. त्याचे कारण असे होते की, प्रमुख उमेदवारांच्या प्रत्येक सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे महायुती महाविकास आघाडी, महायुती, की बहुजन विकास आघाडीचा उमेदवार बाजी मारेल, हे मतमोजणीवेळीच समोर येईल.

सकाळी ७ ते ९ या दोन तासांत केवळ ७.९५ मतदान झाले होते; मात्र त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेल्याचे दिसून आले. शहरी भागातील नालासोपारा येथे एकूण ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. यंदा पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत ६३.९१ टक्के, तर २०१९ च्या निवडणुकीत ६३.७६ टक्के मतदान झाले होते. १५ पूर्णांकाने टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे मतदान पाहता गेल्या लोकसभेच्या जवळपासच टक्केवारी असल्याचे समोर येत आहे.

मतदार वाढला, टक्केवारी ‘जैसे थे’

२०१९ मध्ये एकूण मतदारांची संख्या १८ लाख ८५ हजार २९७ होती. २०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढत २१ लाख ४८ हजार ५१४ झाली. त्यामुळे २.६३ लाखाहून अधिक मतदार वाढल्याचे समोर येत आहे, मात्र टक्केवारी पाहता मतदानात अधिक वाढ झाली नसल्याचे दिसून येते. याचे कारण पाहिले असता डिलीट शिक्क्याचादेखील परिणाम झाला आहे. अनेक मतदात्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे याचा फायदा व तोटा कोणाला होणार, हे येत्या ४ जूनच्या मतमोजणीत समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *